आमदाराच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

कोल्हापूर -  विधानसभेत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत अपमानकारक विधान केले आहे. या विधानाबद्दल सर्व सेविकांनी त्याचा जाहीर निषेध करत अग्रवाल यांच्या पुतळ्याला जोड्याने मारले. तसेच अग्रवाल यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. 

कोल्हापूर -  विधानसभेत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत अपमानकारक विधान केले आहे. या विधानाबद्दल सर्व सेविकांनी त्याचा जाहीर निषेध करत अग्रवाल यांच्या पुतळ्याला जोड्याने मारले. तसेच अग्रवाल यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. 

अंगणवाडी सेविकांनी आज विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. यामध्ये ही मागणी त्यांनी केली. युनियनतर्फे शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेचे गेट धडकून मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात'मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली. मात्र आजपर्यंत मानधनात वाढ केली नाही. अंगणवाडी सेविकांना मोबाईलवरून रिपोर्टिंग करण्याचे आदेश दिले आहेत. या मोबाईल रिपोर्टिंगचा त्रास अनेक कर्मचाऱ्यांना होत असल्याने मोबाईलवरून दैनंदिन व मासिक अहवाल देण्यावर बहिष्कार घालत असल्याची घोषणा जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनने केली.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर 2018 पासून सेविकांना 1500 तर मिनी अंगणवाडी सेविकांना 1250 व मदतनीसांना 750 रुपये मानधन वाढ करण्याचे जाहीर केले; मात्र याची अंमलबजावणी झाली नाही. अंगणवाडी सेविकांना मोबाईलवरून अहवाल भरण्याची सक्‍ती केली आहे. 

हे अहवाल भरण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तर काहींची प्रशिक्षणे होणे बाकी आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर काही अंगणवाडी सेविकांनी दैनंदिन व मासिक अहवाल पाठवण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी काही कर्मचाऱ्यांना मात्र या मोबाईल रिपोर्टिंगचा त्रास होत आहे. महिला आजारी पडत आहेत. म्हणूनच अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे या वेळी संघटनेचे नेते आप्पा पाटील यांनी सांगितले. 

शासनाने पगारवाढ केली आहे; मात्र यात काही अडचणी येत असतील जिल्हा परिषदेचे सभागृह याचा ठराव करून शासनाला पाठवेल. मानधनवाढ जाहीर झाल्यानंतर अभिनंदनाचा ठराव केला होता. मात्र प्रत्यक्षात मानधन मिळण्यासाठी हे सभागृह सर्व ते प्रयत्न करेल. गरज पडल्यास सर्व पदाधिकारी आंदोलन कर्त्यांबरोबर मुंबईला मंत्र्यांच्या गाठीभेटीसाठी येतील. आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत. 
- विजय भोजे,
पक्षप्रतोद, जि. प. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anganwadi employees Boycott on mobile reporting