कॅस'मुळे अंगणवाड्या ऑनलाइन

दौलत झावरे
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

या प्रणालीमुळे जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्या स्मार्ट झाल्या आहेत. हे सर्व काम एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत सुरू आहे.

नगर ः दैनंदिन कामकाजाची माहिती रजिस्टरमध्ये नोंदणी करणे, त्याची जपणूक करणे, संपले की ते जमा करायची. गहाळ झाली तर पुन्हा कारवाईची भीती? अंगणवाडीसेविका अशा चक्रव्यूहात अडकलेल्या होत्या. मात्र, आता त्यांची किमान रजिस्टरची झंझट दूर झाली आहे. अंगणवाडी उघडल्यापासून बंद होईपर्यंतची सर्व माहिती मोबाईलवरील कॉमन ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर (कॅस)मार्फत भरावी लागेल. या प्रणालीमुळे जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्या स्मार्ट झाल्या आहेत. हे सर्व काम एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत सुरू आहे. 

अंगणवाड्यांची दैनंदिन कामे त्यांना रजिस्टरमध्ये नोंदवावी लागत होती. यामध्ये बालकांची उपस्थिती, गृहभेटी, स्तनदा व गर्भवती माता अशा दहा प्रकारची माहिती ठेवावी लागत होती. ही नोंदणी करताना त्यांना कायम बरोबरच रजिस्टर बाळगावे लागे. 
आता "कॅस'मुळे जिल्ह्यातील एकूण 5555 अंगणवाड्या स्मार्ट बनल्या आहेत. सर्वच अंगणवाडीसेविकांना मोबाईलचे वाटप केले आहे. त्यामध्ये कॉमन ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर (कॅस) प्रणालीवर अपलोड करून देण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील 5555 अंगणवाड्यांमध्ये 4801 मोठ्या, तर 754 मिनी अंगणवाड्या आहेत. या सर्व अंगणवाडीतील सेविकांना हे मोबाईल दिले आहेत. दर तीन महिन्याला त्यांना नेटसाठी चारशे रुपये दिले जात आहेत. मात्र, या मोबाईलसाठी नेट कोणत्या कंपनीचे घ्यायचे याचे बंधन नाही. अंगणवाडीसेविकांच्या कार्यक्षेत्रात ज्या कंपनीचे नेटवर्क चांगले चालत असेल त्या ऑपरेटरची निवड करण्याची मुभा दिली आहे. 

कॅस प्रणाली सुरू होऊन सुमारे चार महिन्यांचा कालावधी झाला आहे. विशेष म्हणजे ही प्रणाली वापरण्यात नगर जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. 

सोशल मीडियाला नो एंट्री 

अंगणवाडीसेविकांना दिलेल्या मोबाईलवर व्हॉट्‌सऍप, फेसबुक, हाइक, इंस्टाग्राम आदी सोशल मीडियाला नो एंट्री आहे. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला, तरी मोबाईल हॅंग होतात. त्यामुळे या मोबाईलवर केवळ एकच ऍप्लिकेशन चालते. 

"कॅस' प्रणालीमुळे अंगणवाड्यांची कामे वेगाने होऊ लागली आहेत. पेपरलेसमुळे कागदावरील खर्चात बचत होणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास मदत होईल. 

- संजय कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण 

तक्रारी कमी होणार 

अंगणवाड्या उघडल्या जात नाही, तसेच अंगणवाडीसेविकांकडून कामे होत नाहीत, अशा विविध प्रकारच्या तक्रारी नेहमीच होत असतात. "कॅस' या प्रणालीमुळे या तक्रारी होणार नाहीत. 

मोठ्या अंगणवाड्या ः 4801 
लहान अंगणवाड्या ः 754 
समन्वयक ः 21 
पर्यवेक्षिका 192 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Anganwadi online due to cash