अंगणवाड्या होणार आता ‘स्मार्ट’

Smart-Phone
Smart-Phone

सातारा - जिल्ह्यातील अंगणवाड्यांची सर्व माहिती आता दररोज ऑनलाइन भरली जाणार आहे. यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन दिले जाणार आहेत. या मोबाईलमध्ये ऑनलाइन माहिती जमा करण्यासाठीचे ‘कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’ (कॅस) कार्यान्वित केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट होणार असून, सर्व कारभार पेपरलेस होणार आहे. 

‘कॅस’च्या माध्यमातून अंगणवाडी किती वाजता उघडली, केव्हा बंद केली, बालकांची उपस्थिती, सेविकांच्या गृहभेटी, गर्भवती व स्तनदा मातांची ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे. दरम्यान, या सॉफ्टवेअर हाताळणीबाबतचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण दिले जात आहे. सातारा, कऱ्हाड आणि वाई या तीन ठिकाणांवर पाच बॅचेसच्या माध्यमातून सर्व तालुक्‍यांचे बालविकास अधिकारी, जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका (सुपरवायझर) आणि जिल्ह्यातील प्रत्येक बालविकास प्रकल्पातील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविकांना कालपासून प्रशिक्षण दिले जात आहे. 

या संगणक प्रणालीमुळे सेविकांना आता त्यांच्या सर्व गृहभेटी, बालकांची उपस्थिती आदींसह अंगणवाडीशी संबंधित सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची छायाचित्रे व संबंधित विषयाची माहिती मोबाईलच्या माध्यमातून ‘कॅस’ या संगणक प्रणालीवर अपलोड करावी लागणार आहेत. 

एकात्मिक बालविकास सेवायोजना आयुक्तालयाने हे ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे सर्व कामे ऑनलाइन करता येणे शक्‍य होणार आहे. दुर्गम भाग, अवघड रस्ते व वाहतुकीची अडचण आदींमुळे अहवाल सादर करण्यात येणाऱ्या अडचणी या ॲपमुळे टळणार असून, वेळ व पैशांची बचतही होणार आहे.

अंगणवाड्यांची संक्षिप्त माहिती 
  जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या - ४,८१० 
  कार्यरत अंगणवाडी सेविका - ४,६४८
  कार्यरत मदतनिसांची संख्या - ३,७३०
  एकात्मिक बालविकास प्रकल्पांची संख्या - १८
  कार्यरत पर्यवेक्षिकांची संख्या - १२६

जिल्ह्यातील अंगणवाड्यांची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने अंगणवाड्यांसाठी ‘कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’ कार्यान्वित करणार आहे. यासाठी सर्व सेविकांना स्मार्ट फोनचे वाटप करणार आहे. ॲप्लिकेशन हाताळणीबाबतचे प्रशिक्षणही सुरू केले आहे. त्यानंतर सर्व सेविकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट होतील. 
- मनोज ससे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (महिला व बालकल्याण), जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com