"साहेब, ससा पकडायचा आहे की बिबट्या?' 

समाधान म्हातुगडे - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

सोनाळी - सावर्डे बुद्रुक (ता. कागल) येथे काल बिबट्या पकडण्यासाठी आलेल्या वनविभागाने तब्बल 28 तास खेळखंडोबा केला. वनविभागाने लावलेली जाळी व सापळा पाहून "साहेब, ससा पकडायचा आहे की बिबट्या?' असा संतप्त सवाल नागरिकांनी केला. बिबट्याने अखेर पलायन केल्याने सावर्डे बुद्रुकसह चौंडाळ, सोनाळी, मळगे, पिराचीवाडी, भडगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

सोनाळी - सावर्डे बुद्रुक (ता. कागल) येथे काल बिबट्या पकडण्यासाठी आलेल्या वनविभागाने तब्बल 28 तास खेळखंडोबा केला. वनविभागाने लावलेली जाळी व सापळा पाहून "साहेब, ससा पकडायचा आहे की बिबट्या?' असा संतप्त सवाल नागरिकांनी केला. बिबट्याने अखेर पलायन केल्याने सावर्डे बुद्रुकसह चौंडाळ, सोनाळी, मळगे, पिराचीवाडी, भडगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

सावर्डे बुद्रुक येथील विकासवाडी वस्तीशेजारी काल ऊसतोडीसाठी गेलेले दोन शेतकरी व एक वनकर्मचारी यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याला पकडण्यासाठी 30 कर्मचारी तैनात होते. मात्र त्यांच्याकडे बिबट्याला पकडण्यासाठी पुरेशी व्यवस्था नव्हती. उसात ठाण मांडलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी उसाभोवती मेंढपाळांचे जाळे लावले होते; तर विकासवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच सापळा ठेवला होता. मेंढपाळांच्या जाळ्यावरून उडी मारून बिबट्याने पलायन केल्याची शक्‍यता वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. वनविभागाचे कर्मचारी मंगळवारी सकाळपासून ठाण मांडून होते. काल रात्री बिबट्या सापळ्यामध्ये जाऊन बसेल, असे कर्मचाऱ्यांना वाटत होते. आज सकाळी पुन्हा कुत्री व ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने बिबट्याचा शोध घेतला; मात्र बिबट्याने रात्रीच पलायन केले होते. 

लोक परतले घराकडे 
"अखेर बिबट्या पळाला', अशी बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. बातमी समजेल तसे परिसरातील शेताकडे गेलेले नागरिक घरी परतले. बिबट्याच्या वावरामुळे वस्तीवर राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून लोक घराबाहेर पडण्यासही घाबरत आहेत. बिबट्याला त्वरित पकडावे, अशी मागणी होत आहे. 

कालव्यास रात्रीचे पाणी असल्याने शेतकऱ्यांना शेतास जावे लागते. वनविभागाच्या ढिसाळ नियोजनामुळेच बिबट्या जाळ्यात सापडला नाही. नागरिकांवर बिबट्याने हल्ला केल्यास वनविभागच जबाबदार राहील. बिबट्या सापडेपर्यंत महावितरणने दिवसा वीज सुरू ठेवावी. 
- डी. एम. चौगले, सामाजिक कार्यकर्ते, सोनाळी 

सोनाळीकडील कालव्याच्या दिशेने गेल्याचे बिबट्याचे पायाचे ठसे आढळले असून परिसरातील पोलिसपाटील यांना वर्दी देण्यास सांगितले आहे. आम्ही रात्रीची गस्त सुरू ठेवली असून शोधमोहीम सुरू आहे. 
- महेश पाटील, वनसंरक्षक सेनापती कापशी

Web Title: Angry citizens have questions