शिक्षण विभागातच संतप्त शिक्षकांचे ठाण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

कोल्हापूर - अतिरिक्‍त शिक्षकांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने संतप्त झालेल्या शिक्षकांनी आज जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातच ठाण मांडत आंदोलन केले. त्यामुळे काही काळ माध्यमिक शिक्षण विभागातील कामकाज ठप्प राहिले. यासंदर्भात आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेतले. 

कोल्हापूर - अतिरिक्‍त शिक्षकांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने संतप्त झालेल्या शिक्षकांनी आज जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातच ठाण मांडत आंदोलन केले. त्यामुळे काही काळ माध्यमिक शिक्षण विभागातील कामकाज ठप्प राहिले. यासंदर्भात आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेतले. 

पटसंख्येच्या आधारावरच शिक्षकांची मान्यता ठरत असते. अनेक शाळांमध्ये पटसंख्या बोगस दाखविण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनाने पटसंख्या मोजणीची मोहीमच हाती घेतली. मोहिमेत अनेक शाळांमध्ये बोगस पटसंख्या दाखविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिकचे शेकडो शिक्षक अतिरिक्‍त ठरले. अतिरिक्‍त ठरलेल्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषद किंवा महापालिका शाळांमध्ये केले. मात्र, माध्यमिक शिक्षकांचे समायोजन अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये झाले. ही प्रक्रिया पाच ते सहा महिन्यांपूर्वी झाली होती. काही संस्थांनी शिक्षकांना हजर करून घेतले, तर काही संस्थांनी अतिरिक्‍त ठरलेल्या शिक्षकांना दारातही उभे करून घेतले नाही. मात्र, या सर्वांचेच पगार गेल्या चार महिन्यांपासून थकीत आहेत. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी अनेकवेळा चर्चा केली. परंतु, केवळ आश्‍वासनाशिवाय दुसरे काहीच या शिक्षकांना मिळाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी आज जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयातच ठाण मांडले. वेतनाबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय आम्ही हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे कार्यालयात काही काळ गोंधळ झाल्याने कामकाज ठप्प राहिले. 

आंदोलनाचे नेतृत्व के. ए. पाटील, विजय पाटील, शहाजी मासाळ, बी. ए. फकीर, श्रीमती एस. टी. कांबळे यांनी केले. यासंदर्भात लवकर निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. 

मार्ग काढण्याची ग्वाही 
माध्यमिक शिक्षणाधिकारी नसल्यामुळे कार्यालय अधीक्षक एस. ए. शेख यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. यामध्ये हजर करून घेतले आहे; पण पगार निघालेला नाही आणि काही शिक्षकांना हजरच करून न घेतल्यामुळे त्यांचाही पगार थकीत आहे, यासंदर्भात शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी यातून सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Angry teachers living Education division