'बा विठ्ठला, राज्यात एकही शेतकरी उपाशी राहू देऊ नको'

मंगेश शेवाळकर
सोमवार, 23 जुलै 2018

पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाल्यानंतर बोलताना जाधव म्हणाले, की घरात आजोबा पाई वारी करत होते. त्यानंतर मागील चाळीस वर्षापासून वडील गंगाधर जाधव हे संत गुलाब बाबा यांचे दिंडीमध्ये पाई वारी करतात. आजही वडिल पायीवारीमध्ये आहेत. घरी धार्मिक वातावरण असल्यामुळे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंड्या पाहिल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागून राहते.

हिंगोली : बा विठ्ठला, राज्यातील एकही शेतकरी उपाशी राहू देऊ नको, राज्यात धन धान्य, सुख-समृद्धी नांदू दे असे मागणे विठ्ठलाच्या चरणी मागितली असून आजोबा व वडिलांची पुण्याई यामुळेच विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकलो, अशी प्रतिक्रिया सेनगाव तालुक्यातील भगवती येथील शासकीय पुजेचा मान मिळालेल्या अनिलराव जाधव यांनी व्यक्त केली.

पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाल्यानंतर बोलताना जाधव म्हणाले, की घरात आजोबा पाई वारी करत होते. त्यानंतर मागील चाळीस वर्षापासून वडील गंगाधर जाधव हे संत गुलाब बाबा यांचे दिंडीमध्ये पाई वारी करतात. आजही वडिल पायीवारीमध्ये आहेत. घरी धार्मिक वातावरण असल्यामुळे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंड्या पाहिल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागून राहते. त्यामुळे मागील चार वर्षापासून पंढरपूर येथे दर्शनासाठी येतो. घरी दोन एकर शेत असून पत्नी वर्षा जाधव या आशा स्वयंसेविका आहेत. शेतात पेरणी झाल्यानंतर लगेचच वारीची तयारी सुरू केली जाते. 

यावर्षीही विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर गाठले. विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळाल्यानंतर डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. रात्री दोन वाजून वीस मिनिटांनी महापूजा सुरू झाली तब्बल एक तास महापूजा सुरू होती. साक्षात विठ्ठलाच्या सानिध्यात एक तास काढताना दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आजोबा वडिलांच्या वारीची पुण्याई यामुळेच आमच्या हातून महापूजा झाली असेही त्यांनी सांगितले. बा विठ्ठला शेतकऱ्यांना उपाशी राहू देऊ नको, धन, धान्य सुख-समृद्धी राज्यात नांदू दे, सर्वांना सुखी ठेव असे मागणे विठ्ठलाकडे मागितल्याचे श्री जाधव यांनी सांगितले. आषाढी एकादशीनिमित्त यापुढेही वारीची परंपरा कायम ठेवणार असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.

Web Title: Anil Jadhav hands of Ashadhi Ekadashi mahapooja in Pandharpur