चिमुरडीच्या डोळ्यादेखत बापाचा विहिरीत बुडून अंत

चिमुरडीच्या डोळ्यादेखत बापाचा विहिरीत बुडून अंत

सांगली - सुमारे सत्तर ते ऐंशी फूट खोल विहीर. रात्र झाल्याने विहिरीत काळाकभिन्न अंधार. दुपारी विहिरीत उतरलेलेले अनिल सुरगौंडा पाटील पाय घसरून पाण्यात पडले. त्यांना काढण्यासाठी विहिरीभोवती गर्दी झाली. पण ते विहिरीत पडल्याची खात्री होत नव्हती. इतक्‍यात त्यांच्या लहान मुलीचा आवाज आला ‘‘माझे पप्पा इथेच पडलेत...’’

या निरागस आवाजाने सर्वांचीच खात्री पटली. स्पेशल रेस्क्‍यू फोर्सचे सदस्य अंधारातच विहिरीत उतरले. पंधरा-वीस मिनिटांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह हाती लागला. एरंडोली (ता. मिरज) गावात घडलेली ही घटना. अनिल पाटील व कुटुंबीय शेतात राहतात. शुक्रवारी विहिरीत परडी सोडायची होती. तयारीसाठी दुपारी ते विहिरीत उतरले. पाय घसरून पडले. पोहता येत असूनही विहिरीला धर नसल्याने बुडाले. साता-आठ वर्षांची मुलगी- अक्षताच्या डोळ्यांदेखत वडील विहिरीच्या तळाला गेले. तिनेच कुटुंबीयांना माहिती दिली. पोलिस आले; त्यांचा निरोप मिळताच सांगलीतून स्पेशल रेस्क्‍यू फोर्स गावात पोहोचला.

अवघड आणि अनवट विहिरीत उतरणे म्हणजे मोठे आव्हान होते. पायऱ्या नव्हत्याच. विहिरीचा कडा थेट असल्याने भिंतीच्या आधाराने उतरणेही जिवघेणे होते. पाण्यात पडण्याचीही भीती होती, पण अक्षताने निरागसपणे दिलेली माहिती फोर्सच्या सदस्यांच्या मनाचा तळाला शिवून गेली. दोऱ्यांची सांगड घालत त्यांनी विहिरीचा तळ गाठला. शोधाशोध केल्यावर मृतदेह हाताला लागला. कसरत करतच वर आणला. नाकातोंडात पाणी गेल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला होता. बापाचा मृतदेह निरागसपणे पाहणाऱ्या अक्षताकडे पाहून सर्वांचेच मन हेलावले. 

या मोहिमेत स्पेशल फोर्सच्या राजू कांबळे, स्वप्नील धुमाळ, आनंद गव्हाणे, राहुल शिवशरण, अमोल कांबळे, सागर जावीर, मुकुंद बानुगडे यांनी भाग घेतला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com