कत्तलीसाठी नेण्यात येणारी जनावरे पकडली

ढेबेवाडी - पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतलेले बैल.
ढेबेवाडी - पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतलेले बैल.

ढेबेवाडी/मल्हारपेठ - कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन निघालेली पाच वाहने आज ढेबेवाडी व नवारस्ता येथे पकडून 17 गायी व वासरे आणि 29 बैल पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील दोन वासरे व एका बैलाचा टेंपोतच गुदमरून मृत्यू झाला आहे. ढेबेवाडी व पाटण पोलिसांत याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जनावरे सापडल्याने यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

कत्तलखान्यात जनावरे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाल्यावर आज सकाळी नऊच्या सुमारास सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी या मार्गावर मंद्रुळ कोळे गावच्या हद्दीत सापळा लावला. त्या वेळी दोन टेंपो व एक पिकअप गाडी सापळ्यात अलगद सापडली. त्यामध्ये 29 बैल होते. त्यापैकी एकाचा गुदमरून मृत्यू झाला होता.

संबंधितांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर वाहनातून जनावरे खाली उतरण्यात आली. या वेळी हिंदू एकदा आंदोलन, धर्मजागरण, शिवप्रतिष्ठान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शेती उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारीही घटनास्थळी आले होते. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून, अन्य दोघांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. वाहनांमध्ये लाकडाचा भुसा टाकून जनावरे दाटीवाटीने भरली होती. सहायक पोलिस निरीक्षक श्री. भजनावळे तपास करत आहेत.

मल्हारपेठेतही कारवाई
मल्हारपेठ - नवारस्ता (ता. पाटण) येथे अवैधरीत्या जनावरांची सुरू असलेली वाहतूक रोखण्यात आली. येथील काही युवकांच्या मदतीने पोलिसांनी कारवाई केली. त्यात दोन टेंपो जप्त करून 15 जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत. त्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दोन वाहनांत जनावरे होती. त्यामागील कारमध्ये सहा जण होते. पेट्रोल पंपासमोर दोन लहान टेंपो (एमच 06 एजी 1750) व (एमएच 10 एक्‍यू 3764) थांबले होते. त्यामागे सेंट्रो कार (एमएच 04 सीजी 8801) थांबली होती. कृष्णत कोरे, सूरज कांबळे, संतोष शिंदे, अनिकेत झिमुर, अनिकेत कांबळे व स्वप्नाली कोरे (सर्व रा. उरुण-इस्लामपूर) असा त्यांचा तपशील आहे. या संबंधितांवर अवैधरीत्या गाय व वासरांची वाहतूक केल्याबद्दलचा गुन्हा दाखल झाला आहे. वैभव पवार, अमित माथणे, नितीन माथणे, सुनील माथणे यांनी तेलेवाडी येथे वाहनांना पाठलाग करून पकडले. संशयितांना स्थानिकांनी चोपही दिला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या हवाली केले. सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर यांनी पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com