पशुपक्षी, वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

एक नजर

  • श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर व पोहाळे परिसरातील डोंगर पठारात लांडगा, कोल्हा, साळींदर, इजाट, ससे, रानडुक्कर, रानमांजर तसेच मोर, लांडोर, चिमण्या, टिटवी, बगळा, भोरड्या अशा १२० प्रकारच्या पशुपक्षांचा वावर. 
  • परिसरातील दोन - तीन तलाव कोरडे पडल्याने पशूपक्षी  व वन्यजीवांची भटकंती. 
  • वाघबीळ परिसर, दानेवाडी गिरोली, सादळे मादळे या भागातील डोंगर पठार व जंगलांना लागलेल्या आगीमुळेही मोठ्या प्रमाणात पशुपक्ष्यांचे स्थलांतर. 

 

जोतिबा डोंगर - श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर व पोहाळे परिसरातील डोंगर पठारात असणारे वन्यजीव लांडगा, कोल्ही, साळींदर, इजाट,  ससे, रानडुक्कर, रानमांजर तसेच मोर, लांडोर, चिमण्या, टिटवी, बगळा, भोरड्या  अशा १२० प्रकारच्या पशुपक्षी यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

भागातील दोन  तीन तलाव कोरडे पडल्याने हे पशूपक्षी  व वन्यजीव परिसरात भटकंती करत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाघबीळ परिसर, दानेवाडी गिरोली, सादळे मादळे या भागातील डोंगर पठार व जंगलांना लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात पशुपक्ष्यांचे स्थलांतर झाले आहे. उर्वरित पशूपक्षी व प्राणी यांनी या परिसरात स्थलांतर केले आहे. पोहाळे येथील पाझर तलाव व जोतिबा डोंगरावरील गायमुख तलाव हे दोनच तलाव पाण्यासाठी उपयुक्त असल्याने पशुपक्षांनी या भागाकडे धाव घेतली आहे. 

गेल्यावर्षी कोल्हापूर येथील पक्षीमित्र दिलीप पाटील यांनी केलेल्या गणनेनुसार पोहाळे, जोतिबा परिसरात १२० प्रकारचे विविध जातीचे पक्षी असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार हे पशु पक्षी पाहण्यासाठी भैरोबाचा परिसरात , पांडव लेणी परिसरात गर्दी होती.

यंदा डोंगराला लागलेल्या आगीमुळे  वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच सरपटणारे प्राणी लहान-मोठे पक्षीही यात जळून खाक झाले. त्यामुळे डोंगरांना आगी लावणाऱ्यांना कडक शासन करणे गरजेचे आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया पर्यटन प्रेमी , निसर्गप्रेमी यांच्यातून व्यक्त होत आहेत.

तलाव कोरडा पडल्यानेच स्थलांतर
वडणगे येथील शिवपार्वती तलाव सुशोभिकरण करण्यासाठी कोरडा करण्यात आल्याने या तलाव भागात राहणाऱ्या पशुपक्ष्यांनी पोहाळे भागात स्थलांतर केले आहे .पक्ष्यांचे थवे या ठिकाणी दिसू लागले आहेत .

तीव्र उन्हामुळे या भागातील काही तलावांनी तळ गाठला आहे. डोंगरांना लागलेल्या आगीत पशुपक्षीही स्थलांतरित झाले आहेत. पाण्यासाठी त्यांना वणवण करण्याची वेळ आली आहे. वनविभागाने या पक्षांसाठी लहान तळी बांधून पाण्याची सोय करावी. 
- दिलीप पाटील,
पक्षीमित्र कोल्हापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Animals, wildlife, Birds migration due to water scarcity