इंदोरीकर महाराजांचा पाय खोलात, अंनिसने काय केले पहा...

Anis' complaint about Indorekar Maharaj
Anis' complaint about Indorekar Maharaj

नगर : निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वक्तव्यावरून चांगलाच गदारोळ सुरू आहे. सोशल मीडियाने महाराजांची बाजू लावून धरली असली, त्यांना विरोध करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. तृप्ती देसाई यांच्यानंतर आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रही आहे.

त्याबाबत त्यांनी तक्रारअर्जही दिला आहे. इंदोरीकर महाराज हे या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी कायदेशीर मार्गाने चालले आहेत. मात्र, दररोज वेगवेगळ्या तक्रारींमुळे त्यांचा पाय आणखी खोलात जात आहे. 

गुन्हा दाखल करा

कीर्तनामध्ये स्त्रियांविषयी आणि मुलाच्या जन्माबाबत बेजबाबदार वक्तव्य केल्याप्रकरणी निवृत्ती देशमुख महाराज (इंदोरीकर) यांच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समिती व बुवाबाजी संघर्ष विभागातर्फे पोलिस अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायदाच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. 

बुवाबाजी संघर्ष विभाग व अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यवाह ऍड. रंजना पगार-गवांदे यांनी तक्रार अर्जात म्हटले, निवृत्ती देशमुख महाराज यांचे नगर जिल्ह्यात झालेल्या कीर्तनाचा व्हीडिओ मराठी कीर्तन व्हीडिओ या युट्यूब चॅनलवर 4 जानेवारी अपलोड झाला आहे.

टायमिंगनेच आणली ही वेळ

कीर्तनामध्ये त्यांनी पुत्र प्राप्तीचा संदेश दिला आहे. त्यात "स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशुभ वेळेला झाला तर औलाद रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळविणारी होतात.' असे विधान केले आहे. त्यापुढे ही जाऊन "टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असभ्य, बेजबाबदार, कायदा आणि संविधान विरोधी वक्तव्ये केली आहेत. 

समानतेची परंपरा

वारकरी धर्मात लहान थोर, स्त्री, पुरूष असा भेदभाव केला जात नाही. समानतेची माऊली म्हणून आदराने उल्लेख करायची परंपरा आहे. कीर्तन हे समाजात प्रबोधन व जागृती करण्यासाठी असते. महाराज चुकीची अवैज्ञानिक, अंधश्रद्धा पसरविणाऱ्या गोष्टी सांगतात. मूल कसे होते याचे शरीर विज्ञान आहे.

भेदाभेद अमंगळ

जात, धर्म, वंश, प्रांत, लिंगानुसार समाजात भेदभाव करता येत नाही. त्यांनी तो लिंग भेदभाव केला आहे. सर्व भारतीय नागरिकांना वैज्ञानिक दृष्टिकोन प्रचार, प्रसार, अंगिकार करायचे कर्तव्य संविधानाने सांगितले ते महाराजाने केलेले नाही. 

ते संविधानाचा प्रचार करतात

संतांनी समाजातील अनिष्ट, अघोरी प्रथा-परंपराविरोधात काम केले आहे. सध्या अनेक कीर्तनकार आपल्या कीर्तनातून संविधानाचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत, हे अभिनंदनीय आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रातील संत-समाज सुधारकांचा पुरोगामी वारसा पुढे चालविण्याचे काम करते.

बेजबाबदारपणा

आम्ही महाराजांच्या या अशास्त्रीय वक्तव्यांचा धिक्कार करतो. मूल जन्माबाबत बेजबाबदार वक्तव्य केल्याप्रकरणी निवृत्ती देशमुख महाराज (इंदोरीकर) यांच्याविरुद्ध (पीसीपीएनडीटी) पूर्व गर्भधारणा आणि प्रसूतीपूर्व निदान कायद्यानव्ये तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. 
 

महाराज, मग जुळी कशी जन्मतात... 
इंदोरीकर महाराजांना आमचा जाहीर प्रश्‍न, त्यांनी जुळी मुले कशी होतात? याचा दिवस, तारीख सम की विषम ही सांगावी. जुळ्या मुलांत काही वेळा मुलगा-मुलगी होऊ शकते हे का होते? याचेही स्पष्टीकरण त्यांनी द्यावे, असे आवाहन समितीने केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com