अण्णा भाऊंच्या पुतळ्याला सांगलीत ताडपत्रीचा आडोसा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

सांगली - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा गुरुवारी (ता. १८) पन्नासावा स्मृतिदिन. पुढील महिन्यात एक ऑगस्टला जन्मशताब्दी वर्ष सुरू होतेय. भाषा आणि प्रांतांच्या सीमा ओलांडून जागतिक साहित्यक्षेत्रात नावारूपाला आलेल्या या प्रतिभावंताची जन्मभूमीतच उपेक्षा झाली.

सांगली - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा गुरुवारी (ता. १८) पन्नासावा स्मृतिदिन. पुढील महिन्यात एक ऑगस्टला जन्मशताब्दी वर्ष सुरू होतेय. भाषा आणि प्रांतांच्या सीमा ओलांडून जागतिक साहित्यक्षेत्रात नावारूपाला आलेल्या या प्रतिभावंताची जन्मभूमीतच उपेक्षा झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी आपल्या तेजस्वी शाहिरीने महाराष्ट्र ढवळून काढला, त्या अण्णा भाऊंच्या पुतळ्यासाठी गुंठाभर जागा मिळू शकली नाही. कर्मवीर चौकात एका ताडपत्रीचा आडोसा घेऊन हा पुतळा जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही त्यांच्या झालेल्या उपेक्षेची साक्ष देत उभा आहे.

राज्य शासनाचे अण्णा भाऊ साठे यांच्या नावे आर्थिक विकास महामंडळ आहे. दीर्घकाळ महामंडळाला पूर्णवेळ अधिकारी नव्हता. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांची तातडीने पदोन्नतीवर बदली झाली आणि आता त्यांच्याकडे या महामंडळाची धुरा सोपवली आहे. अण्णा भाऊंच्या नावाची स्मारके-सभागृहे राज्यात ठिकठिकाणी झाली; मात्र त्यांच्या जन्मगाव वाटेगावमधील स्मारकाचा वाद दीर्घकाळ चिघळत राहिला.

त्यानंतर जिल्ह्याच्या केंद्रस्थानी मुख्य चौकात त्यांचे स्मारक-पुतळा असावा, अशी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. त्यासाठी सुधाकर गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी मोठा संघर्ष केला. मात्र मुरलेल्या राजकारण्यांनी या कार्यकर्त्यांमधील तो असंतोष शांत केला. त्यानंतर आजही हा पुतळा कर्मवीर चौकात उपेक्षा सहन करीत उभा आहे.

‘अण्णा भाऊ’ ही चार अक्षरं पिचलेल्या समाजमनाचा हुंकार आहेत. आजही त्यांच्या लेखनातून वंचितांच्या पिढ्यांना लढण्याची प्रेरणा मिळत आहे. राजकारण्यांसाठी अण्णा भाऊंचे नाव आज चलनी नाणे झाले आहे. मात्र अण्णा भाऊंचा हा उद्‌घोष फक्त तोंड देखलाच असल्याचे आजवर दिसून आले.

राजकारणी आपापल्या सोयीने आपापल्या प्रेरणास्थानांची पुतळे-स्मारके उभी करतात. मात्र आज अण्णा भाऊंसाठी अशा खस्ता कोण काढणार? दारिद्य्र आणि राजकारणाच्या शापचक्रात अडकलेल्या अण्णांनी १८ जुलै १९६९ रोजी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबीयांची उपेक्षा झाली आणि आता त्यांच्या पुतळ्याचीही...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anna bhau Sathe Memory day special