भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनात सहभागी होण्यासाठी अण्णा हजारेंचे प्रसिद्धीपत्रक

anna-hajare
anna-hajare

राळेगणसिद्धी (नगर) : महाराष्ट्र राज्यामध्ये खेड्यापाड्यापासून मंत्रालयापर्यंत पक्ष आणि पार्ट्यांच्या गटतटामुळे खेड्यांच्या आणि राज्याच्या इतर सर्वांगिण विकास कामांना खिळ बसत चालली आहे. प्रसार माध्यमांमधून आपण पाहत आहोत की, राजकिय पक्ष व काही नेते एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोपाचे वार-पलटवार करत असल्याचे दिसते. सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी आपला पक्ष आपली पार्टी सत्तेमध्ये कशी येईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते. सत्तेच्या राजकारणाच्या गोळाबेरजेमुळे बऱ्याच पार्ट्यांचा राष्ट्रीय सामाजिक दृष्टीकोन हरवत चालला आहे हे स्पष्ट होते. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या चक्रव्युवहात बरेच पक्ष पार्टीचे लोक अडकले असल्याचे दिसत आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात आपण मोठमोठी धरणे, रस्ते, इमारती उभ्या केल्या. परंतू मी स्वतःसाठी जगत असताना माझा शेजारी, गाव, समाज, देश याचे मी काही देणे लागतो या जाणिवेतून निष्काम भावनेतून फलाची अपेक्षा न करता गाव, समाज, आणि देशाची सेवा म्हणून मी कार्य करत राहील अशी ध्येयवादी माणसे 70 वर्षांनंतर उभी झाली नाहीत हे दुर्दैव आहे. अशी माणसे उभी झाल्याशिवाय समाज, राज्य व देशास उज्वल भविष्य मिळणे अवघड आहे. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, जीवनात थोडा त्याग व अपमान पचविण्याची शक्ती असलेल्या लिडरशीप शिवाय खऱ्या अर्थाने विकास होणार नाही.

याही परिस्थितीत काही सामाजिक कार्यकर्ते पक्ष पार्टीविरहीत गाव, देश व समाजाच्या हिताकरीता आपापल्या परिने काम करत आहेत. मात्र सामाजिक काम करणारे कार्यकर्ते संघटित नसल्याने त्यांचा अपेक्षित प्रभाव पडत नाही. म्हणून भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकीची जाणिव असलेले जात पात धर्म वंश इत्यादी भेद न पाळणाऱ्या कार्यकर्त्यांचे संगटन महाराष्ट्र व देशात उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मिळणाऱ्या प्रतिसादामुळे स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही समाज, राज्य आणि राष्ट्र उभारणीची वेळ गेलेली नाही व सामाजिक राष्ट्रीय जाणीव असलेले समविचारी सेवाभावी चारित्र्यशील व ध्येयवादी कार्यकर्ते संघटित झाल्यास देशाचे उज्वल भविष्य दूर नाही असा विश्वास निर्माण झाला आहे.

निसर्गाचा नियम आहे की दाण्याने भरलेली ज्वारी, बाजरी, मक्याची भरघोस कणसे शेतात तेव्हाच दिसतात जेव्हा एक दाणा स्वतःला मातीत गाडून घेतो. अशा प्रकारे समाज व राष्ट्रहितासाठी गाडून घेणाऱ्या कार्यकर्त्यांची देशाला गरज आहे. त्यासाठी सामाजिक व राजकिय दृष्टीकोन असलेल्या ध्येयवादी कार्यकर्त्यांनी स्टँप पेपरवर प्रतिज्ञापत्र करून द्यायचे आहे की, मी शुद्ध आचार, शुदध विचार निष्कलंक जीवन ठेवीन. वाईट गोष्टींचा जीवनात डाग लागू देणार नाही. समाज, राज्य आणि राष्ट्रहितासाठी थोडा का होईना त्याग करील. कुठल्याही राजकिय पक्ष अथवा पार्टीतर्फे कोणतीही निवडणूक लढविणार नाही. समाज व देशाची निष्काम भावनेने सेवा करील असे प्रतिज्ञापत्र करून देणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन गाव पातळीपासून उभे करण्याचे प्रयत्न भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन तर्फे सुरू आहेत.

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात सामिल होण्यासाठी गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने असे प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक आहे. सदरचे प्रतिज्ञापत्र हे आंदोलनात सभासद होऊन जबाबदारीने काम करू इच्छिणाऱ्या कार्य़कर्त्यांकरीता आवश्यक असेल. मात्र जे कार्यकर्ते केवळ वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी होतात त्यांना प्रतिज्ञापत्र बंधनकारक राहणार नाही. प्रतिज्ञापत्र न देणाऱ्या कार्यकर्त्यांना आंदोलनात महत्त्वाची जबाबदारी किंवा कोणतेही पद देण्यात येणार नाही.

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे राज्यात मध्यवर्ती कार्यकारी मंडळ असेल. प्रत्येक जिल्हा, तालुका व गाव स्तरावर त्यांच्या शाखा असतील. जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर चारित्र्यशील कार्यकर्त्यांची निवड स्थानिक प्रतिज्ञापत्र दिलेल्या कार्यकर्त्यांनी करावयाची आहे. बऱ्या वाईट गोष्टींना तेच जबाबदार असतील. प्रत्येक गावात प्रतिज्ञापत्र भरून देणारे किमान 15 चारित्र्यशील कार्यकर्त्यांची निवड जिल्हा शाखेने तालुका शाखेच्या सहकार्याने करायची आहे. अशी निवड केल्यानंतर त्यास

मध्यवर्ती मंडळाची मान्यता घेणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने एका गावामधून किमान 15 चारित्र्यशील सदस्य झाले आणि तालुक्यात 100 गावे असतील तर तालुक्यातील किमान 1500 चारित्र्यशील सामाजिक कार्यकर्त्यांचे राजकारण विरहीत संघटन उभे राहू शकेल. तसे झाल्यास तालुक्यातील सामाजिक व सामूहिक प्रश्नांवर अशा किमान 1500 संघटित कार्यकर्त्यांनी अहिंसेच्या मार्गाने मोर्चे, धरणे, मौन, उपोषणे अशा मार्गाने आंदोलने केली तर तालुका स्तरावरील जनतेचे प्रश्न सोडविता येऊ शकतील. त्याचप्रमाणे एका जिल्ह्यात जर 10 तालुके असतील व वरीलप्रमाणे चारित्र्यशील कार्यकर्ते जोडले गेले तर जिल्ह्यातून किमान 15 हजार कार्यकर्त्यांचे संघटन होऊ शकेल. अशा संघटित कार्यकर्त्यांनी जिल्हा स्तरावर आंदोलन केल्यास जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सुटू शकतील.

तसेच वरीलप्रमाणे संघटन झाल्यास राज्यातील सर्व जिल्ह्यांतून मिळून 4 ते 5 लाख चारित्र्यशील कार्यकर्ते संघटित होतील. त्यातील किमान दोन लाख कार्यकर्ते जरी आंदोलनात उतरले आणि सरकारचे नाक दाबले तरी तोंड उघडेल व जनतेचे प्रश्न मार्गी लागतील.  सत्ताधारी कोणीही असो ते फक्त सरकार पडण्याला घाबरतात. म्हणून संघटना बांधणीतून गाव स्तरापासून राज्य स्तरापर्यंत जर जनसंसदेचा दबावगट निर्माण झाला तर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला भाग पाडता येईल असा विश्वास वाटतो.

यापूर्वी 1997 पासून राज्यात पक्ष-पार्टी राजकारण विरहीत 33 जिल्ह्यामधील 252 तालुक्यामध्ये भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाची गाव पातळीपासून राज्य स्तरापर्यंत संघटन बांधणी करण्यात आली होती. त्यामुळे सरकारची इच्छा नसताना राज्यात माहितीचा अधिकार, ग्रामसभेचा कायदा, बदलीचा कायदा, दप्तर दिरंगाईचा कायदा, ग्रामरक्षक दलाचा कायदा, लोकपाल व लोकायुक्त कायदा, सहकार कायद्यातील महत्त्वपूर्ण दुरूस्ती, रस्त्याच्या टोल धोरणामध्ये बदल, रेशनिंग व्यवस्थेतील सुधारणा, बुडीत पतसंस्थेतील गोरगरीबांची रक्कम परत देण्याची तरतूद आणि व्यवस्थेतील भ्रष्ट अधिकारी व नेत्यांवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न झाले व त्यात यशही आले. एवढेच नव्हे तर यातील काही बाबींची (उदा. माहितीचा अधिकार, लोकपाल व लोकायुक्त कायदा) इत्यादींची देश पातळीवर दखल घेण्यात आली. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन या संस्थेकडे कोणतीही सत्ता नसताना, अधिकार नसताना, आर्थिक पाठबळ नसताना झालेले कार्य पाहता केवळ जनतेतील चारित्र्यशील कार्यकर्त्यांच्या दबावातून सरकारला जनहिताचे अनेक निर्णय घेण्यास भाग पाडता येते हे स्पष्ट होते. त्यासाठी चारित्र्यशील कार्यकर्त्यांचे संघटन महत्वाचे आहे.

अहिंसेच्या मार्गाने हे सर्व करत असताना मला तसेच अनेक कार्यकर्त्यांना समाज व राष्ट्रहितासाठी जेलमध्ये जावे लागले. समाज राज्य व राष्ट्रहितासाठी जेलमध्ये जाणे हा इतर कोणत्याही अलंकारापेक्षा खरा अलंकार आहे. या अलंकारामुळे शरीर नव्हे तर जीवन शोभून दिसते, असा माझा अनुभव आहे. म्हणून भविष्यात राज्य व समाज हितासाठी जेलमध्ये जाण्याची सुद्धा तयारी कार्यकर्त्यांना ठेवावी लागेल.

नुकतीच राळेगणसिद्धी येथे राज्यभरात नव्याने संघटनेची बांधणी करण्याकरीता 28 व 29 एप्रिल 2018 रोजी राज्यातील 13 जिल्ह्यातील प्रतिज्ञापत्र दिलेल्या 125 कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यानंतर राज्यभरातून संघटना बांधणीकरिता कार्यकर्ते प्रतिज्ञापत्रासह अर्ज पाठवत आहेत. पुढील टप्प्यात प्रत्येकी 125 ते 150 कार्यकर्त्यांच्या बॅचेस नुसार 4 ते 5 कार्यशाळा घेऊन 750 कार्यकर्ते प्रशिक्षित होऊन आपापल्या जिल्हा, तालुका व गावामध्ये संघटन उभे करण्याच्या प्रयत्नास लागतील. वर्षभरात या कार्यकर्त्यांचे कार्य दृष्य स्वरूपात दिसू लागल्यास राजकिय पक्ष पार्टी व नेते स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात जे अपेक्षित जन हिताचे काम करू शकले नाहीत त्यापेक्षा अधिक प्रभावीपणे हे कार्यकर्ते काम करू शकतील, असा मला विश्वास वाटतो.

काही लोकांकडून मला राजकारणाचा तिटकारा असल्याचा अपप्रचार केला जातो. परंतु माझा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या अप्रतिम व सुंदर घटनेवर पूर्ण विश्वास आहे. घटनेच्या परिच्छेद 84 (ख) व (ग) मध्ये निवडणूक लढविण्यासाठी भारतात राहणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख आहे. पक्ष-पार्टीचा नाही. शिवाय पक्ष पार्ट्यांनी जर स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात खऱ्या अर्थाने जनहितासाठी काम केले असते तर असे आंदोलन उभारण्याची वेळच आली नसती. शिवाय आज प्रत्येक छोट्या छोट्या प्रश्नांवर सामान्य जनतेला रस्त्यावर उतरून आंदोलने करावी लागतात तशी वेळही आली नसती. पण दुर्दैवाने तसे घडलेले नाही. म्हणून केवळ सत्ताधारी बदलल्याने विशेष फरक पडणार नाही. त्यासाठी व्यवस्था परिवर्तन करावे लागेल. म्हणून अशा प्रकारे व्यवस्था परिवर्तनासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनातर्फे राज्यात नव्याने संघटन बांधणी सुरू आहे. ही व्यवस्था परिवर्तनाची नवी चळवळ आहे. म्हणून राज्य स्तरावरील ह्या संघटनेत सहभागी होण्याची इच्छा असलेल्या निष्कलंक चारित्र्यशील सेवाभावी वृत्तीच्या कार्यकर्त्यांनी लेटरहेड वरील पत्त्यावर संपर्क साधावा.

व्हॉट्सअप- 9850200090  
फेसबुक- www.facebook.com/KBAnnaHazare ,
युट्यूब- https://www.youtube.com/channel/UC08rjrgnb9QvDBgi_dyB87Q

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com