उपोषण करणारच - अण्णा हजारे

उपोषण करणारच - अण्णा हजारे

राळेगणसिद्धी  - राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत लोकायुक्त व उपलोकायुक्त कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी दिल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारचे आभार मानले. पण, ‘कायदा विधानसभा व विधान परिषदेत होतो; त्यामुळे ही मागणी मान्य झाली, असे म्हणता येत नाही. म्हणून मी उद्यापासून (बुधवार) उपोषण करण्यावर ठाम आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. 

या कायद्यानुसार आता मुख्यमंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत आले असून, लोकायुक्त त्यांची ‘इनकॅमेरा’ चौकशी करू शकतील. हजारे यांची लोकायुक्ताची मागणी मंजूर करण्यात आली असली, तरी त्याचे कायद्यात रूपांतर झाले नाही. तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारीतील इतर काही मागण्या मंजूर न झाल्याने हजारे उद्यापासून ‘माझे गाव माझे आंदोलन’ यानुसार राळेगणसिद्धी येथे उद्यापासून उपोषण आंदोलन करण्यावर ठाम आहेत. या बाबतची सर्व तयारी झाली असून आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली आहे. जोपर्यंत लोकपाल व लोकायुक्त कायदा होत नाही व त्यांच्या नेमणुका सरकार करत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धारही हजारे यांनी आज बोलून दाखवला.

मुख्यमंत्र्यांना पत्र
लोकायुक्ताबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याचे जाहीर होण्यापूर्वी हजारे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. केंद्रात लोकपाल कायदा झाल्यानंतर राज्यात एका वर्षात लोकायुक्त कायदा विधानसभेत करावा, अशी कायद्यात तरतूद असूनही चार वर्षे झाली, राज्यात हा कायदा केला नाही. राज्यात लोकायुक्त कायदा करावा व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात म्हणून मी उपोषण करत आहे, असे नमूद करून हजारे यांनी पत्रात सर्व आश्‍वासनांची यादीच दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com