Anna's experiment to be implemented across the state: Dawley
Anna's experiment to be implemented across the state: Dawley

अण्णांचा प्रयोग राज्यभरात राबवू : डवले 

पारनेर : ""प्लॅस्टिक कागदाद्वारे अस्तरीकरण केल्याने पाणी गळती थांबली. यामुळे राज्यभरातील टॅंकरवर होणारा करोडो रुपयांचा खर्च वाचू शकतो. ही संकल्पना प्रत्यक्षात राबवून देशात पथदर्शी प्रकल्प राबविला आहे. आता आम्ही राज्यभरात आगामी काळात असा प्रकल्प राबविण्यासाठी लवकरच आराखडा तयार करणार आहोत. त्याला सरकारची मान्यता घेऊन ती योजना राज्यभरात राबवू,'' असे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी "सकाळ'शी बोलताना केले. 

आज (ता. 23) डवले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राबविलेल्या बंधाऱ्यातील कागदाच्या अस्तरीकरणाचा प्रयोग पाहण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी "सकाळ'शी संवाद साधला. समवेत मृदसंधारणचे संचालक कैलास मोते, कृषी सहसंचालक मृदसंधारण दादाराम सप्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, उपविभागीय अधिकारी गहिना (आत्मा), अनिल गवळी आदींसह सामाजिक कार्यकर्ते सुरेश पठारे, लाभेश औटी, उपसरपंच सुरेश दगडू पठारे आदी उपस्थित होते. 

गॅबियन बंधारे बांधू 
डवले म्हणाले, ""अण्णांचा हा उपक्रम देशाला आदर्शवत आहे. या उपक्रमामुळे देशभरात जलक्रांती घडू शकते. यातून राज्याची दुष्काळमुक्ती होऊ शकते. यापुढील काळात अण्णांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे राज्यातील दुष्काळी तालुक्‍यात कमी खर्चाचे गॅबियन बंधारे बांधून त्यात कागदाचे अस्तरीकरण केले जाईल.'' 

पुनर्भरण प्रकल्पाची पाहणी 
डवले यांनी हजारे यांच्याबरोबर राळेगणसिद्धी येथील गॅबियन बंधारे, खोल सलग समतल चर, पाझर तलाव व पाणी पुनर्भरण प्रकल्पाची विहीर आदी ठिकाणांची पाहणी केली. एका बंधाऱ्यात पाऊस सुरू झाल्यामुळे कागदाचे अस्तरीकरणाचे काम अर्धवटच झाले. तो बंधारा आज कोरडाठाक असल्याचे दाखविले. त्याच्याच शेजारी अस्तरीकरण पूर्ण झाल्यामुळे तो बंधारा पाण्याने भरल्याचे दाखवले. 

"सकाळ'मुळे प्रकाशझोत 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राबविलेल्या उपक्रमाची माहिती "सकाळ'ने सचित्र प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत राज्याचे जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी हजारे यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा करून भेटीची वेळ मागितली. अण्णांनी ती आजची वेळ दिल्याने डवले राळेगणसिद्धीत आले होते.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com