साताऱ्यात कोरोना तीनशे पार, नवीन 31 रूग्ण सापडले

In Satara District Corona Patients Increased
In Satara District Corona Patients Increased

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्ण सापडण्याचा धडाका आजही कायम सुरू राहिला. आज रात्री तब्बल 31 बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येने तिनशेचा आकडा पार केला. जिल्हा कारागृहातील सहा कैदी कोरोनामुक्त झाले हाच दिवसभरातील दिलासा ठरला.गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत 93 संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाबाधितांनी शंभरी गाठली. काल (ता. 23) एकाच दिवशी 77 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकाला सुरवात झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती शोधण्यात, संबंधित परिसर सील करणे या कामांमध्येप्रशासन व्यस्त होते. परंतु, आज सायंकाळपर्यंत कोरोनाचा एकही नवीन रूग्ण सापडला नव्हता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला थोडी उसंत मिळाली होती.

मात्र, रात्री साडेआठ वाजता तब्बल 31 जण कोरोनाबाधित निघाले. त्यामध्ये कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील एक, कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयातील 14, जिल्हा रुग्णालयातील दहा, तर वाई ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या पाच जणांसह इतर एकाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 309 झाली आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल शंभरपेक्षा जास्त रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे त्रिशतक पार केले आहे.

यामध्ये कऱ्हाड तालुक्यात अकरा बाधित रूग्ण आढळले असून यामध्ये म्हासोली येथील सहा, इंदोलीत चार, शामगावला एक बाधित रूग्णांचा समावेश आहे. पाटण तालुक्यातील गोकुळ येथील तीन रूग्ण आहेत. तसेच जावली चार, कोरेगाव तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे. 

जिल्हा कारागृहातील सहा कैदी आज कोरोनामुक्त झाले ही दिलासा देणारी घटनना होती. पुण्याहून जिल्हा कारागृहात पाठवलेले काही कैदी कोरोनाबाधित निघाले होते. त्यातील दोघे यापूर्वीच कोरोनामुक्त झाले आहेत. यासोबतच आणखी सहा रुग्ण कोरोनामुक्त करण्यात वैद्यकीय पथकाला यश आले. त्याचबरोबर गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये कोरोना संशयित म्हणून 93 जणांना दाखल करण्यात आले आहे.

त्यामध्ये जिल्हा रुग्णालयात 55, वाई ग्रामीण रुग्णालयात 38 जणांना दाखल करण्यात आले. या सर्वांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांच्यासह अजून 317 संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

 
ती महिला खातगुण नव्हे; खडगावची 
काल रात्री 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यामध्ये मुंबईहून आलेली खातगुण (ता. खटाव) येथील महिला पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, ती महिला खातगुणची नसून सातारा तालुक्‍यातील परळी खोऱ्यातील खडगाव येथील असल्याचे आज प्रशासनाने कळविले आहे. त्यामुळे सातारा तालुक्‍यातील रुग्णांमध्ये आणखी एकाची भर पडली आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com