esakal | मिरजेत आणखी एक डॉक्‍टर बाधित; बेशिस्तपणा वाढवतोय मिरजेचा धोका
sakal

बोलून बातमी शोधा

 Another doctor positive in Miraj

मिरज (जि . सांगली) शहरात आज पुन्हा एक डॉक्‍टर कोरोनाबाधित असल्याचे तपासणीमध्ये स्पष्ट झाले.

मिरजेत आणखी एक डॉक्‍टर बाधित; बेशिस्तपणा वाढवतोय मिरजेचा धोका

sakal_logo
By
प्रमोद जेरे

मिरज (जि . सांगली) : शहरात आज पुन्हा एक डॉक्‍टर कोरोनाबाधित असल्याचे तपासणीमध्ये स्पष्ट झाले. सुभाषनगर रस्त्यावरील दत्त कॉलनी परिसरात दवाखाना असणाऱ्या डॉक्‍टरांना कोरोना झाल्याचे सायंकाळी शासकीय यंत्रणेकडून जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी सर्व यंत्रणाकडून पाहणी करण्यात आली. याशिवाय सुभाषनगरच्या एक महिला आणि दोघे पुरुष अशा तीन डॉक्‍टरांसह 27 जणांना अलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. 

शहरातील सुभाषनगर रस्त्यावर दत्त कॉलनी परिसरात छोटा दवाखाना चालवणारे व भरपूर जनसंपर्क आणि सामान्यांचा डॉक्‍टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉक्‍टरांवर गेल्या दहा दिवसांपासून खासगी रुग्णालयात अन्य व्याधींसाठी उपचार घेत होते. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागताच त्यांना खाजगी रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात हलवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या तपासणीचा अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला. त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, तहसीलदार रणजित देसाई, आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे डॉ. अक्षय पाटील यांचेसह अनेक वरिष्ठांनी या परिसरास भेट दिली. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने परिसरात घबराट पसरली आहे. 

दरम्यान, सोमवारी रात्री कोरोनामुळे निधन झालेल्या अमननगर येथील 52 वर्षांच्या व्यक्तीच्या संपर्कात अनेकजण आल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले. यामध्ये सुभाषनगर येथील एक महिला डॉक्‍टरसह त्यांचे सहकारी कर्मचारी या व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने या सर्वांना अलगीकरण कक्षात राहण्याचे सांगण्यात आले. हे रुग्णालय काही दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. याशिवाय शहरातील अन्य दोन डॉक्‍टरही अलगीकरण कक्षात गेले आहेत. याच व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 27 जणांना अलगीकरण कक्षात राहण्याचा आदेश प्रशासनाने दिला.  

 मिरज : कर्नाटकातुन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या, शहराचा वाढता विस्तार, आणि निव्वळ बेशिस्तीमुळे शहरासह तालुक्‍यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होतो आहे. शहर आणि तालुक्‍यात सापडणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होत असलेली वाढ ही शहर आणि तालुक्‍याला पुन्हा एकदा सक्तीच्या लॉकडाऊन कडे नेणारी ठरते आहे.प्रशासन, आरोग्य आणि पोलिस या तिन्ही यंत्रणांनी यापुढे अधिक सतर्क राहून कोरोनाचा हा विळखा आधिक घट्ट होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी.त्यासाठी प्रसंगी कठोर कारवाया करण्यासही प्रशासन आणि पोलिसांनी मागे पुढे पाहू नये. 

गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना कहरामध्ये गेल्या पंधरा दिवसापर्यंत मिरज तालुक्‍याने आपला गड शाबूत राखला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून मात्र शहर आणि तालुक्‍यात अचानकच कोरोनाचे रुग्ण तासागणिक वाढू लागले. याबाबत शासकीय यंत्रणांकडून काहीही खुलासा होणे शक्‍य नसले तरी शासनाकडून प्रसिद्ध होणारी आकडेवारी हीच तालुक्‍याचा कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचा भक्कम पुरावा आहे. त्यामुळे यापुढे सर्व शासकीय यंत्रणा, समाजधुरीण आणि सामान्य नागरिकांना काटेकोर शिस्तीचे पालन करण्याशिवाय पर्याय नाही. सामान्य नागरिकांचे सार्वजनिक ठिकाणचे बेशिस्त वर्तनही हा विळखा घट्ट होण्यास अधिक कारणीभूत ठरते आहे. मिरज शहर आणि तालुक्‍यातील अनेक मोठ्या गावांमध्ये रस्त्यांवर भाजीपाला खरेदीसह किरकोळ कारणास्तव होणारी गर्दी ही देखील हा विळखा अधिक घट्ट होण्यास कारणीभूत ठरते आहे.

प्रशासन आणि प्रसारमाध्यमांद्वारे वेळोवेळी वारंवार आवाहन करूनही किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांमध्ये खबरदारीचा लवलेशही नसल्याचे अनेक ठिकाणी जाणवते आहे. शहरासह ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी चोरीछुपे होणारे लग्न सोहळे वाढदिवस, मटण आणि दारूच्या राजरोसपणे होणाऱ्या पार्ट्या ही देखील याच कोरोनाच्या वाढत्या धोक्‍यासाठीच्या कारणांपैकी प्रमुख कारणे आहेत. मिरज शहरात आज अखेर मिळून आलेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने अनेक व्याधींचा इतिहास असलेल्या रुग्णांचा अधिक संख्येने समावेश आहे. तर ग्रामीण भागात सापडलेले रुग्ण कोणत्या ना कोणत्या कारणास्तव कर्नाटक अथवा अन्य ठिकाणी जाऊन आल्याचेही ही समजते आहे.त्यामुळे केवळ आवश्‍यक ती खबरदारी घेतली नसल्याने रुग्ण वाढत असल्याचेही वैद्यकीय तज्ञांचे मत आहे.सहाजिकच शहर आणि तालुक्‍यांमध्ये यापुढे प्रशासनास अधिक काटेकोर आणि कडक शिस्तीसाठी प्रसंगी कठोर कारवाई करणे भाग पडणार असल्याचाही सुर प्रशासकीय यंत्रणेतून व्यक्त होत आहे. एकूणच शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या ही चिंताजनक आणि धोकादायक असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

रुग्णांना थोपविता येणार नाही
मिरज हे वैद्यकीय उपचारांसाठीचे महत्त्वाचे केंद्र असल्याने कर्नाटकातून याठिकाणी उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना थोपविता येणार नाही.परंतु यापैकीच काही रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले तरी त्यासाठीची आवश्‍यक खबरदारी घेतली जाईल. 
- समीर शिंगटे, प्रांताधिकारी, मिरज 

मोठा धोका टळला आहे

कोरोनासाठीचे सॅम्पल यापूर्वी आरोग्य यंत्रणेकडून घेतले जायचे परंतु गेल्या काही दिवसांपासून महापालिकेनेही हे नमुने तपासणीसाठी घेण्यास सुरुवात केल्याने भविष्यातील मोठा धोका टळला आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत दिसत असलेली वाढ ही संभाव्य धोके टाळणारी आहे. 
- स्मृती पाटील, उपायुक्त, महापालिका 

"योग्य" पद्धतीने वठणीवर आणले जाईल.

बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही. यापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये केलेल्या कारवाया हटके होत्या.पण यापुढे सार्वजनिक ठिकाणी बेशिस्तपणे वागणाऱ्यांना कडक कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल.रस्त्यावरील विक्रेते आणि व्यावसायिकांना कायदेशीर कारवाईची भाषा समजणार नसेल तर त्यांनाही "योग्य" पद्धतीने वठणीवर आणले जाईल. 
- संदीपसिंह गिल, पोलीस उपाधीक्षक, मिरज