मिरजेत सावकारीमध्ये आणखी एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 March 2020

मिरज  शहरातील तंतुवाद्य व्यावसायिक संजय मिरजकर याला 50 लाख रुपयांचे कर्ज देऊन दोन कोटी रुपयांची लुबाडणूक करणाऱ्या खासगी सावकारांच्या टोळीतील संजय दादासाहेब लांडगे याला आज अटक करण्यात आली.

मिरज : शहरातील तंतुवाद्य व्यावसायिक संजय मिरजकर याला 50 लाख रुपयांचे कर्ज देऊन दोन कोटी रुपयांची लुबाडणूक करणाऱ्या खासगी सावकारांच्या टोळीतील संजय दादासाहेब लांडगे याला आज अटक करण्यात आली. तर सूरज शहाजी दिवसे याला काल पहाटे ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान यापूर्वी अटक केलेल्या जितेंद्र ढोले या सावकाराच्या घरातून संजय मिरजकर यांच्याकडून घेतलेले कोरे बंधपत्र आणि धनादेश असे महत्त्वपूर्ण पोलिस पुरावे पोलिसांना झडती मध्ये हाती लागले आहेत. 

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या खासगी सावकारी टोळक्‍याची पळापळ आता थांबली आहे. पोलिसांनी या टोळक्‍याच्या स्थावर मालमत्तांनवर टाच आणून त्यांना न्यायालयातून फरारी घोषित करण्याच्या हालचाली सुरू होताच या टोळक्‍याने पोलिसांना शरण जाणे पसंत केले. तरीही पोलिसांनी त्यांच्याच पद्धतीने सध्या या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आहे.

यामध्ये शहर पोलिसांनी पहिली झडती ही या प्रकरणात अटक केलेल्या संतोष कोळी या खासगी सावकाराच्या सराफी पेढीवर टाकली. यामध्ये तब्बल पंधरा लाख रुपयांची सोन्या-चांदीचे दागिने सावकारीतूनच गहाणवट घेतलेले सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले. त्यानंतर आज शनिवारी पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या जितेंद्र अण्णासाहेब ढोले या राजकीय वलय असलेल्या खासगी सावकाराच्या घराची झडती घेतली.

या झडतीमध्ये पोलिसांना दोन कोरे धनादेश आणि कोरी बंधपत्रे यासारखे महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. त्यामुळे जितेंद्र ढोले याचा संजय मिरजकर यांच्या लुबाडणूकमध्ये सहभाग असल्याचा महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. ढोले या खासगी सावकाराकडून आणखी तपास करणे आवश्‍यक असल्याचे सांगत पोलिसांनी त्याच्याही पोलिस कोठडीत मंगळवार पर्यंत मुदत वाढवून घेतली.

दरम्यान पोलिसांच्या कारवायांचा फास आवळत चालल्याचे पाहून याच टोळक्‍यातील सूरज शहाजी दिवसे आणि संजय दादासाहेब लांडगे हे दोन खासगी सावकारही पोलिसांच्या गळाला लागले. यापैकी सूरज दिवसे याला आज पहाटे अटक करण्यात आली. तर संजय लांडगे याला सायंकाळी अटक करण्यात आली. यापैकी सूरज दिवसे याला सोमवार (ता.2) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर संजय लांडगे याला रविवारी (ता.1) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another money lender arrested in Miraj