पुरबाधित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणखी 8 कोटी रूपयांचा निधी : पालकमंत्री जयंत पाटील यांचा पाठपुरावा 

घनश्‍याम नवाथे
Wednesday, 9 December 2020

सांगली-  राज्यात गतवर्षी जुलै ते ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे एक हेक्‍टरपर्यंत पीक कर्जमाफ करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला होता. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने शासनाकडून पूरबाधित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुरवणी प्रस्तावातून आणखी 8 कोटी रूपये निधी प्राप्त झाला आहे. लवकरच ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी दिली. 

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे यापूर्वी 15 फेब्रुवारी 2020 रोजी पूरबाधित शेतकऱ्यांना 80 कोटी रूपये आणि 27 मार्च 2020 रोजी 50 कोटी 91 लाख रूपये असा एकूण 130 कोटी 91 लाख रूपये इतका निधी प्राप्त झाला होता. ही रक्कम एकूण 26 हजार 180 इतक्‍या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. त्यानंतर पंचनाम्यामधील पीक किंवा क्षेत्र चुकले असलेले तसेच इतर काही कारणांमुळे बॅंकांनी कर्जमाफीचे पुरवणी प्रस्ताव सादर केले होते. या पुरवणी प्रस्तावानुसार 8 कोटी रूपये इतक्‍या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. पुरवधी प्रस्तावानुसार निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा केला. त्यानुसार नुकतेच 2 नोव्हेंबरला 8 कोटी रूपये इतका निधी प्राप्त झाला आहे. लवकरच ही रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरीत करण्यात येणार आहे. 

प्राप्त झालेला 8 कोटी रूपयांचा निधी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व राष्ट्रीयकृत व व्यापारी बॅंका यांना रक्कम वितरीत केली आहे. पुरबाधीत कर्जमाफीमध्ये पात्र असणाऱ्या पण अद्याप लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी संबंधित बॅंक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही उपनिबंधक श्री. करे यांनी केले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another Rs 8 crore fund for debt waiver of flood affected farmers: Guardian Minister Jayant Patil's follow up