होनमुर्गी परिसरात आढळली दुर्मिळ मूर्ती शिल्पे! 

Solapur
Solapur

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अनेक मंदिरे व मूर्ती शिल्पे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पुरातत्त्व विभागाच्या मदतीने अनेक मंदिरांचा, मूर्तींचा अभ्यास, संवर्धन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी मूर्ती शिल्पे ही मंदिराच्या मंडपात, देवककोष्टकात ठेवलेली तर काही ठिकाणी मंदिराच्या बाहेर रस्त्यावर, उघड्यावर पडलेली दिसून येतात. होनमुर्गी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरात अशाच प्रकारच्या वाराही, चामुंडा, भैरवी, विष्णू आणि क्षेत्रपाल यांच्या मूर्ती उघड्यावर आहेत. या मूर्ती पहिल्यांदाच पाहण्यात आल्याचा दावा पुरातत्त्व संशोधक विद्यार्थी तारिक तांबोळी यांनी केला आहे. 

तारिक तांबोळी हे जुळे सोलापुरात राहण्यास असून त्यांचे पुरातत्त्व विषयाचे शिक्षण पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे झाले आहे. तांबोळी यांनी काही दिवसांपूर्वी अभ्यासाच्या अनुषंगाने होनमुर्गी गावाला भेट दिली. ग्रामस्थ कलप्पा रेवप्पा तेली यांच्या घराच्या अंगणात काही मूर्ती शिल्पे बाहेर उघड्यावर ठेवलेली दिसून आली. 

तांबोळी म्हणाले, "सोलापूर जिल्ह्यातील वाराहीची ही मूर्ती प्रथमच स्वतंत्रपणे पाहावयास मिळते. सप्तमातृकांपैकी एक असलेली ही मूर्ती अर्धपद्मासनात बसलेली असून चतुर्भुज आहे. प्रदक्षिणेनुसार, महाळुंग, गदा, चक्र व फळ यांनी युक्त आहे. तसेच अलंकाराने सुशोभित केलेली आहे. तसेच चामुंडाची मूर्ती, भैरवीची मूर्ती, विष्णूची मूर्ती, विष्णूची मूर्ती, क्षेत्रपालाची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळतात. मूर्ती शास्त्रावर अनेक ग्रंथ आहेत परंतु अशा ग्रंथात होनमुर्गी परिसरात आढळणाऱ्या असामान्य अशा काही मूर्तीची वर्णने आढळत नाहीत. होनमुर्गी गावात आढळलेली भैरवीची मूर्ती याचेच उदाहरण आहे.'' 

होनमुर्गी येथील प्राचीन शिल्पे ही वैशिष्ट्यपूर्ण असून कोणत्याही देवतेच्या आसनस्थानी त्यांचे वाहन दिसत नाहीत. त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या आयुधांचा समन्वय येथे साधण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगून तांबोळी म्हणाले, ""या मूर्तींच्या जडणघडणीनुसार मूर्तीचा कालखंड साधारणत: 12 ते 14 वे शतक असावे. मूर्ती शक्ती उपासनेचा संबंधित असल्याचे वाटते. तसेच शैव व वैष्णव संप्रदायाशी निगडित असावेत. कारण वाराही ही वैष्णव संप्रदाय तर चामुंडा व भैरवी शैव संप्रदायाशी संबंधित आहे. महाराष्ट्रात कल्याणी, चालुक्‍य, शिलाहार, यादव यांची या काळात सत्ता होती. स्वाभाविकच या घराण्यांनी मंदिर व मूर्ती कलेला प्रोत्साहन दिल्याचे दिसून येते.' 

ही मूर्ती शिल्पे स्थळ, काळपरत्वे त्यांच्या आयुधावरून, वाहनावरून ओळखली जातात. अशा मूर्तींपैकी अनेक मूर्ती या एकमेकांशी समन्वय साधणाऱ्या असतात. परंतु, अशा काही मूर्ती मर्यादित प्रदेशातच आढळतात. त्यापैकीच अनेक मूर्ती शिल्पे होनमुर्गी येथे पाहण्यास मिळतात, असेही तांबोळी यांनी आपल्या अभ्यासावरून सांगितले. 

होनमुर्गी हे गाव सीना नदीच्या तीरावर असून सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरपासून 22 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे पुण्यातील प्रसिद्ध लोकसंत श्री जंगली महाराज यांचे हे जन्मस्थळ आहे. वाराही, चामुंडा व भैरवी प्रकारच्या मूर्ती जास्त करून उत्तर कर्नाटक या भागात आढळतात. होनमुर्गी गावात आढळलेली वाराहीची स्वतंत्र मूर्ती महाराष्ट्रातील एक दुर्मिळ मूर्ती असून सप्तमातृकांचे स्वतंत्र शिल्पपट येथे अस्तित्वात असावा. परंतु काळाच्या ओघात जमिनीखाली गाढला गेला असावा किंवा नष्ट झाला असावा. त्यामुळे थोड्याच मातृशिल्पांचेच आपणास दर्शन होते. होनमुर्गी येथे पूर्वी एखादे मोठे देवालय असावे, असा अंदाज आहे. 

सध्या या मूर्तींकडे कोणाचेही लक्ष नाही. हा इतिहासाचा ठेवा जतन करण्याची गरज आहे. सरकारी पातळीवर किंवा अभ्यासकांना, संशोधकांना तळमळ असायला हवीच पण स्थानिकांना सुद्धा या ठेव्याची माहिती होणे गरजेचे आहे. मूर्तींचे संकलन केल्यास लपलेला इतिहास लोकांसमोर येऊ शकेल. सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्व विभाग व राज्य पुरातत्त्व विभाग यांनी याची दखल घ्यावी. तसेच संशोधकांनीही या दुर्लक्षित मूर्तींकडे लक्ष द्यावे. 
- तारिक तांबोळी, संशोधक विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com