प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्यांचेच साहित्य जिवंत राहते - सुशीलकुमार शिंदे

प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्यांचेच साहित्य जिवंत राहते - सुशीलकुमार शिंदे

कोल्हापूर - प्रवाहाच्या विरुद्ध जाणाऱ्यांचेच साहित्य जिवंत राहते. साहित्य माणसाला घडवत असते, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज येथे केले. 

लेखिका अनुराधा गुरव यांचा अमृतमहोत्सव आणि लेखन, प्रकाशनाचा 51वा वाढदिन व गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. शाहू स्मारक भवनमध्ये सोहळा झाला. येथे अनुराधा गुरव यांचा सत्कार करण्यात आला. 

सोलापुरातील आमच्या कॉलेजमधील एका लेखिकेच्या अमृतमहोत्सवाला हजर राहिल्याचा वेगळाच आनंद असल्याचे सांगून श्री. शिंदे म्हणाले, "साहित्य हे माणसाला घडवते. माणसाच्या जीवनात रंग भरते. प्रत्येकाच्या जीवनात रसिकता असते. ग्रामीण साहित्यातून अनुराधाताई यांचे साहित्य नक्कीच ग्रामीण भागाचे दर्शन घडविणारे आहे. साध्या सोप्या शब्दांत त्यांनी लिखाण केले आहे. त्यामुळे त्यांचे साहित्य वाचताना मराठी "डिक्‍शनरी' घेऊन बसावे लागत नाही. प्रवाहाच्या विरुद्ध जाणाऱ्यांचेच साहित्य जिवंत राहते. असेच साहित्य माणसाला घडवते. विचारवंतांचे प्रतिबिंब साहित्यातून उमटते. त्यांच्या लिखाणातून स्फूर्ती मिळते. नवोदित लेखकांनीही लिहित जावे. कोण काय टीका करतो याकडे दुर्लक्ष करावे. त्यातूनच खरे आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाणारे साहित्य तयार होते. तेच समाजासाठी उपयुक्त ठरते. अनुराधाताईंचे लिखाणही असेच आहे. प्र. के. अत्रेंपासून अनेक साहित्यिकांनी त्यांच्या साहित्यातून समाज घडविण्यासाठी प्रयत्न केले. कन्नड, तमिळ, उर्दू, मराठी, हिंदी अशा अनेक भाषांतून निर्माण होणारे साहित्य खरोखरच माणसांच्या जीवनात रंग भरते.' 

लेखिका अनुराधा गुरव मनोगतात म्हणाल्या, "ग्रामीण भागातील परिस्थितीनेच मला लिखाणाची आवड लावली. विधानसभा निवडणुकीसाठी मी एकेकाळी उमेदवारांच्या पहिल्या क्रमांकात होते. परंतु राजकारण आवडत नव्हते, म्हणूनच मी लेखिका झाले, प्राचार्य झाले. आजच्या अमृत सोहळ्यास दादा (सुशीलकुमार शिंदे) उपस्थित राहिल्याचाही आनंद झाला.' 

विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी विद्यापीठ सेवकांना त्यांच्या समस्या श्री. शिंदे यांनी कशा पद्धतीने सोडविल्या याची माहिती आणि लेखिका अनुराधा गुरव यांच्याविषयी आदर असल्याचे सांगितले. 

शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, पत्रकार विजय चोरमारे यांनी मनोगत व्यक्त केले. येथे गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा झाला. 

प्रा. भीमराव धुळूबुळू यांनी स्वागत केले. डॉ. विश्‍वनाथ भोसले यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे स्वागत आणि ओळख प्राचार्य डॉ. आशीष गुरव यांनी करून दिली. शुभेच्छा संदेश वाचन गौरी भोगले यांनी केले. लेखिकेच्या साहित्यावर पहिली तुलनात्मक पीएचडी मिळविलेल्या डॉ. बाळासाहेब कामाण्णा यांचा सत्कार झाला. संपादकीय मनोगत प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांनी केले. उपप्राचार्य प्रा. टी. के. सरगर यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com