काँग्रेसच्या अनुराधा नागवडे ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवार?

काँग्रेसच्या अनुराधा नागवडे ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवार?

श्रीगोंदे : काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांना नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. समर्थकांसह नागवडे दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचेही सांगण्यात येते. 
या संदर्भात नागवडे यांची ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

शिवसेनेचे श्रीगोंद्यातील नेते घनश्‍याम शेलार यांनी शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचे संकेत आजच दिले असताना, गेले चार दिवस पुणे व मुंबईत राजेंद्र नागवडे यांनी ‘राष्ट्रवादी’च्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करीत अनुराधा नागवडे यांच्या लोकसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे सूत्रांनी सांगितले. नागवडे यांनी पुण्यात दोन दिवसांपूर्वी सकाळी अजित पवार यांची भेट घेतली व रात्री शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हेही उपस्थित होते.

समजलेल्या माहितीनुसार, डॉ. सुजय विखे यांनी नगर मतदारसंघातून लोकसभेसाठी लावलेली फिल्डिंग भेदण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. त्यातच श्रीगोंद्यात आमदार राहुल जगताप व नागवडे यांचे राजकीय ‘अंडरस्टॅडिंग’ चांगलेच जुळले आहे. शेलार आता पक्षात येण्याच्या तयारीत असल्याने, सगळेच जुळून आल्याने ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांनी अनुराधा नागवडे यांचा पर्याय पुढे केल्याची चर्चा आहे. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात या दोन दिग्गज काँग्रेस नेत्यांमधील राजकीय ‘सख्य’ सर्वश्रुत आहे. नागवडे कुटुंब थोरात यांना मानणारे आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी पवार व थोरात यांच्यातील बैठकांमध्ये श्रीगोंद्याचा विषय पुढे आल्याचे समजते.

दरम्यान, अनुराधा यांना लोकसभेची आणि राहुल जगताप यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचे ठरल्याचे समजते. डॉ. सुजय विखे पाटील विखे यांनी जरी उमेदवारी केली, तरी त्यांची श्रीगोंद्यावर मोठी भिस्त आहे. त्यांना श्रीगोंद्यात खिंडीत गाठून, येथील स्थानिक संभाव्य वादाचा प्रश्न निकाली काढण्याचे दुहेरी राजकीय सूत्र राष्ट्रवादी काँग्रेस अवलंबणार असल्याचे यातून स्पष्ट होते.

पवार साहेब व अजितदादांशी चर्चा झाली, पण अद्याप अंतिम निर्णय झाला नाही. बाळासाहेब थोरात व हर्षवर्धन पाटील तसेच तालुका व लोकसभा मतदारसंघातील प्रमुखांशी चर्चा करून राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेणार आहे. - राजेंद्र नागवडे, काँग्रेस नेते व अनुराधा यांचे पती

सभापतिपदाचा राजीनामा देणार 
अनुराधा नागवडे यांच्याकडे जिल्हा परिषदेत महिला बालकल्याण समितीचे सभापतिपद आहे. लोकसभा उमेदवारी निश्‍चित झाल्यावर व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच त्या या पदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते. मात्र, काँग्रेसकडून तक्रार होणार नसल्याने त्या जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा देणार नसल्याचे सांगण्यात येते.

थोरात, पाटील यांचा हिरवा कंदील?
नागवडे कुटुंब थोरात यांच्याप्रमाणेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही मानणारे आहे. या दोघांशी याबाबत चर्चा झाली असून, त्यांचा होकार मिळाल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेस नेत्यांशी असणाऱ्या संबंधांना ‘बाधा’ न येता नागवडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com