चांगभलच्या गजरात आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ यात्रेची सांगता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी (ता. चिक्कोडी) येथील श्री हालसिद्धनाथांची भोंब यात्रेची लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साहात सांगता झाली. महाराष्ट्रसह कर्नाटकातील सीमावासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या नाथांची पाच दिवस यात्रा चालली. 

म्हाकवे - श्री क्षेत्र आप्पाचीवाडी (ता. चिक्कोडी) येथील श्री हालसिद्धनाथांची भोंब यात्रेची लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साहात सांगता झाली. महाराष्ट्रसह कर्नाटकातील सीमावासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या नाथांची पाच दिवस यात्रा चालली. 

ढोलांचा आवाज, कैताळांचा निनाद, बासरीच्या सुरांनी परिसर दुमदुमला. ‘हालसिद्धनाथांच्या नावानं चांगभल’, ‘हालसिद्धनाथ महाराज की जय’ असा जयघोष केला. खोबरे, खारीक व भंडाऱ्याच्या उधळणीमुळे मंदिर परिसर पिवळ्या शालूत न्हाउन निघाला. यात्रेच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने भाविकांची तसेच यात्रेत दुकान लावलेल्यांची तारांबळा उडाली. नाथांच्या भक्तांनी मंदिरात दिलेल्या उसाची कर वाघापूर व रायबाग येथील मानकऱ्यांकडून तोडली गेली.

कर तोडल्यानंतर वालंग सोहळा झाला. नाथांच्या सबिन्यात मानाचे अश्‍व, बकरी, पुजारी, मानकरी, भाकणूक कथन करणारे भगवान डोणे यांच्यासह भाविकांनी खडकावरील मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी सबिना वाड्यातील मंदिराकडे गेला. वाड्यातील मंदिरात हालसिद्धनाथ यांच्या मूर्तीची व गादीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तिथून कुरलीची पालखी लवाजमासह पायी चालत कुरलीकडे रवाना झाली. 

कुरलीतील हलसिद्धनाथ मंदिरात वालंग करण्यात आला. भाकणूक कथन करणारे श्री भगवान ढोणे यांचा येथून परतीचा मार्ग सुरू झाला. येथून नानीबाई चिखली, खडकेवाडा, यमगे, मुरगूडमार्गे ते वाघापूरला रवाना झाले.

भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कागल, कोल्हापूर, मुरगूड, संकेश्‍वर, निपाणी, संभाजीनगर, गडहिंग्लज, आगारांनी खास एसटी बसेसची सोय केली होती. निपाणी पोलिसांनी यात्रा काळात चोख बंदोबस्त केला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यात्रा समितीने नेटके संयोजन केले होते.

मानकऱ्यांच्या उपस्थितीत रंगला पालखी सोहळा 
भक्तांनी नाथांच्या पालखीवर खारीक, खोबरे, पैसे व भंडाऱ्यांची अखंड उधळण केली. यामुळे मंदिर परिसराने पिवळा शालू परिधान केला होता. पालखी उत्सवात नाथांची मूर्ती तर समोर सासनकाठी, अबदागिरी, घोडे, बकरी, चांदीच्या काठ्या, देवाचे मुखवटे, गादी यांच्या समावेशाने मंदिराची प्रदक्षिणा घालण्यात आली. पालखी सोहळ्यात परंपरागत मानकरी सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appachiwadi Halsidhanath Yatra completed in Spiritual environment