Vidhan Sabha 2019 : राजकारणाच्या नादात करमाळ्यात सफरचंदाचा भाव दुप्पट !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

करमाळा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठिंबा दिल्याने राजकीय गणितं बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. येथील राजकीय रणधुमाळीत अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या "सफरचंदाचा" भाव वाढला आहे.​

पंढरपूर : करमाळा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठिंबा दिल्याने राजकीय गणितं बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. येथील राजकीय रणधुमाळीत अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या "सफरचंदाचा" भाव वाढला आहे.

करमाळा विधानसभा मतदार संघात प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात शिवसेना आणि अपक्षांमध्ये कमालीची चुरस वाढली आहे. शिवसेनेने आमदार नारायण पाटील यांना डावलून रश्मी बागल यांना उमेदवारी दिली आहे. सुरवातीला दुरंगी वाटणारी येथील निवडणूक आता अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्यामुळे तिरंगी झाली आहे. त्यातच, अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादीनेही पाठिंबा जाहीर केला केल्याने शिंदे समर्थकांचे बळ वाढले आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार  शिंदे यांच्या निवडणूक चिन्ह असलेल्या सफरचंदाचा भाव वाढला आहे. या निवडणूकीत रश्मी बागल यांनी शिवधनुष्य उचलण्याची शपथ घेतली आहे तर आमदार नारायण पाटलांची शिट्टीच्या जोरावर पुन्हा आमदारकी मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा सुरू आहे. 

ऐनवेळी करमाळयाच्या आखाड्यात उतरलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी ही जोरदार मुसंडी मारली आहे. शिंदे यांना सफरचंद निवडणूक चिन्ह मिळाले आहे. प्रत्येक सभा आणि बैठकांच्या ठिकाणी अवर्जून सफरचंदांचे वाटप केले जात आहे. सध्या करमाळयाच्या बाजारात सफरचंदाला मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने येथील बाजारात अचानक सफरचंदाचे भाव दुपट्टीने वाढले आहेत. बाजारात सफरचंदाचा भाव वाढला असला तरी करमाळयातील निवडणूकीत सफरचंदाचा भाव किती वाढेल हे निवडणूक निकाला नंतरच स्पष्ट होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apple prices doubled in Karmala vidhan sabha Constituency