कोल्हापूरच्या पथकाकडून सोलापुरातील बागांची पाहणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जून 2019

सोलापुरातील स्मार्ट सिटी अंतर्गत होत असलेल्या कामांचे कोल्हापूर महापालिकेतून कौतुक... 
 

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरातील बागांची सुधारणा पाहून कोल्हापूर महापालिकेतून आलेल्या पथकाने कौतुक केले. हुतात्मा बाग, ऍडवेंचर पार्कसह अन्य ठिकाणी करण्यात आलेल्या कामांची पाहणी करून आमच्याकडेही प्रयत्न करण्यात येतील, असे कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कल्लशेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. 

कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी हे वृक्ष प्राधिकरण समिती, हेरिटेज समितीच्या सदस्यांसोबत शनिवारी सोलापूर अभ्यास दौऱ्यावर आले होते. या पथकात पर्यावरण अभ्यासक, वृक्ष प्राधिकरणचे सदस्य उदय गायकवाड, हेरिटेज कमिटीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरी, मुख्य लेखाधिकारी संजय सरनाईक, उपअभियंता हर्षजित घाडगे, सहायक अभियंता महादेव फुलारी, संजय भोसले, विष्णू कराड, राजश्री कलशेट्टी यांचा सहभाग होता. महापालिका आयुक्त डॉ. दीपक तावरे, उद्यान अधीक्षक निशिकांत कांबळे, स्मार्ट सिटीचे अधिकारी आशुतोष पाटील यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील बागांत करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी पर्यावरणप्रेमी संजीवकुमार कलशेट्टी, सचिन जाधव उपस्थित होते. 

कोल्हापूरच्या पथकाने सुरवातीला भुईकोट किल्ला परिसरातील हुतात्मा बागेची पाहणी केली. त्यानंतर हे पथक पासपोर्ट कार्यालयाशेजारी ऍडवेंचर पार्कमध्ये पोचले. येथील बागेची रचना आणि खेळाच्या साहित्याची मांडणी सर्वांना आवडली. ग्रामदैवत सिद्धेश्‍वर मंदिरात दर्शनानंतर सर्वांनी गणेशमूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या विष्णू घाटाची माहिती घेतली. रूपाभवानी मंदिर परिसरातील शहा बाग, रंगभवन येथील पब्लिक प्लाझा हे पथकाला दाखविण्यात आले. मी लहानपणी हुतात्मा बाग परिसरात अभ्यास करण्यासाठी येत, असे सांगताना आयुक्त कलशेट्टी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

कोल्हापूर महापालिकेच्या वतीने बागांच्या सुधारणेचे काम लोकसहभागातून हाती घेण्यात येणार आहे, त्या पार्श्‍वभूमीवर आम्ही सोलापुरात स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेल्या बागांच्या सुधारणांची माहिती घेतली. अनेक ठिकाणी चांगल्या सुधारणा केल्या आहेत. सोलापूरप्रमाणे आमच्याकडे काही बदल करता येतील. 
- मल्लिनाथ कलशेट्टी, 
आयुक्त, कोल्हापूर महापालिका 

कोल्हापूरहून अभ्यास दौऱ्यानिमित्त आलेल्या पथकाला स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेला हुतात्मा बागेसह अन्य बागांच्या सुधारणांची माहिती दिली. येथील बागांच्या कामांचे पथकाने कौतुक केले आहे. शहरातील अन्य बागांची कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत. सोलापूरकरांनी बागांचे संवर्धन करावे. 
- डॉ. दीपक तावरे, 
आयुक्त, सोलापूर महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appreciation from Kolhapur Municipal Corporation on the activities of Smart City in Solapur