esakal | तूर्तास दिलासा; इस्लामपुरात नव्या, जुन्या दोन्ही ठिकाणी भाजी विक्रीला मान्यता
sakal

बोलून बातमी शोधा

Approval for sale of vegetables in both new and old places in Islampur

इस्लामपूर शहरातील जुनी भाजी मंडई स्थलांतरित करण्याबाबत पालिका पदाधिकाऱ्यांनी तूर्तास समन्वयाचा मार्ग काढत दोन्ही ठिकाणी भाजी विक्रेते व व्यापारी यांनी व्यवसाय करावा असा निर्णय घेतला आहे.

तूर्तास दिलासा; इस्लामपुरात नव्या, जुन्या दोन्ही ठिकाणी भाजी विक्रीला मान्यता

sakal_logo
By
धर्मवीर पाटील

इस्लामपूर (जि. सांगली) : शहरातील जुनी भाजी मंडई स्थलांतरित करण्याबाबत पालिका पदाधिकाऱ्यांनी तूर्तास समन्वयाचा मार्ग काढत दोन्ही ठिकाणी भाजी विक्रेते व व्यापारी यांनी व्यवसाय करावा असा निर्णय घेतला आहे. पालिका सर्वसाधारण सभेत यावर चर्चा झाली. प्रारंभी पूर्ण भाजी मंडई नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत मवाळ आणि समन्वयाची भूमिका घेतल्याने विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

जुनी भाजी मंडई नव्याने दीड कोटी रुपये खर्चून बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईत स्थलांतरीत करण्याच्या पदाधिकारी, प्रशासनाच्या निर्णयाला विरोधाची भूमिका होती. स्थानिक व्यापारी आणि वाळवा तालुका संघर्ष समितीने आंदोलन केल्यावर नगराध्यक्ष, प्रशासनाने व्यापाऱ्यांना तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र निर्णय तूर्तास म्हणजे ठराविक महिन्याभरासाठी घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. शेतकरी, व्यापाऱ्यांत विभागणी करून दोन्ही ठिकाणी काहींना बसण्याची परवानगी देण्याचे ठरले आहे. 

शहराच्या पश्‍चिमेला गणेश मंदिर परिसरात असलेल्या जुन्या भाजी मंडईला सुमारे शंभर वर्षाचा इतिहास आहे. यापूर्वी सन 2006 साली ही मंडई स्थलांतरित करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावेळीही व्यापाऱ्यांनी त्याठिकाणी असणाऱ्या सुविधांचा मुद्दा पुढे करत विरोधाची भूमिका घेतली होती.

नव्याने दीड कोटी रुपये खर्च करून पालिकेने अण्णासाहेब डांगे चौकात मंडई उभारली आहे. चांगल्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. परंतु तिकडे जाण्याला आताही विरोध झाला. मंडई नव्या जागेतच भरेल, अशी भूमिका प्रशासनाने घेतल्यानंतर काही व्यापारी व भाजीविक्रेत्यांनी एकत्र येऊन विरोध केला. या निर्णयाचा निषेध म्हणून पालिकेच्या आवारातच भाजी मंडई भरवली. आता झालेला निर्णय मात्र समाधानकारक असल्याची विक्रते, व्यापाऱ्यांची आहे. 

मालमत्ता हस्तांतरण कर कमी 

यापूर्वी मालमत्तेच्या रकमेच्या पटीत दोन टक्के इतकी रक्कम हस्तांतरण कर म्हणून आकारली जात होती. पदाधिकारी, क्रेडाई आणि इंजिनियर्स असोसिएशनने सातत्याने पाठपुरावा केल्याने आता ही रक्कम निवासी मालमत्तेसाठी अवघी 500 आणि व्यावसायिकसाठी 1000 रुपये इतकी करण्यात आली. यापूर्वी नागरिकांना हस्तांतरण करापोटी हजारो रुपये मोजावे लागत होते. आता तो त्रास कमी होणार आहे.

संपादन : युवराज यादव