इस्लामपूरात भाजी मंडई, वाहनतळ खर्चाचा विषय मंजूर 

धर्मवीर पाटील
Wednesday, 23 December 2020

चौदाव्या वित्त आयोगाअंतर्गत कार्यात्मक अनुदानातून भाजी मंडई व वाहनतळासाठी खर्च करण्याबाबतच्या मुद्द्यावर सुमारे साडेचार तास चाललेल्या सभेत अंतीमक्षणी नगराध्यक्षांनी आपला विशेष अधिकार वापरत विषय मंजूर केला.

इस्लामपूर : चौदाव्या वित्त आयोगाअंतर्गत कार्यात्मक अनुदानातून भाजी मंडई व वाहनतळासाठी खर्च करण्याबाबतच्या मुद्द्यावर सुमारे साडेचार तास चाललेल्या सभेत अंतीमक्षणी नगराध्यक्षांनी आपला विशेष अधिकार वापरत विषय मंजूर केला. या खर्चासाठी राष्ट्रवादीने दिलेली उपसूचना मूळ विषयाशी संबंधित नसल्याचे सांगत नगराध्यक्षांनी ती फेटाळली. त्यानंतर राष्ट्रवादीने केलेली मतदानाची मागणीही त्यांनी फेटाळली. नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या उपस्थितीत विशेष सभा झाली. 

4 कोटी 47 लाखाचे कार्यात्मक अनुदान आणि आधीचे मंजूर 2 कोटी असे एकत्रित 6 कोटी 47 लाख रुपये खर्चून भाजी मंडई व वाहनतळाचे पहिल्या टप्प्यातील काम हाती घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादीने त्याला विरोध करत एकदम निधी उपलब्ध करून काम सुरू करण्याची भूमिका घेतली होती. वाहनतळ व भाजी मंडई इमारतीचा फेब्रुवारी 2019 मध्ये एकमताने ठराव मंजूर झाला होता. नगराध्यक्षांनी 2017 च्या शासनाच्या अध्यादेशानुसार हा निधी खर्च होईल, कार्यात्मक अनुदान कसे खर्च करावे याबाबत शासनाच्या ठराविक सूचना आहेत. त्यामुळे शासनाच्या निर्णयाच्याविरोधात ठराव होणार नाही, अशी भूमिका घेतली. हे कार्यात्मक अनुदान इतर कामांवर खर्च करण्याचा राष्ट्रवादीचा आग्रह नगराध्यक्षांनी फेटाळला. 

संजय कोरे यांनी मंडई शहराची अत्यावश्‍यक गरज आहे, पार्किंग आणि योग्य व्यवस्थेला प्राधान्य द्यावे. जुन्या वास्तूसाठी या योजनेतील निधी वापरता येईल का? जयंत पाटील सभागृहाच्या दुरुस्तीसाठी वापरावी, घरकुल योजनेच्या शेजारी अग्निशमन विभागाजवळच्या हॉलसाठी खर्च करावा, सामाजिक स्मशानभूमी नूतनीकरणाचा प्रश्न आहे, आणखी एखादी गॅस शवदाहिनी बसवावी अशा सूचना केल्या. विश्वनाथ डांगे यांनीही स्मशानभूमी दुरुस्ती, हरितपट्टा विकसनासाठी खर्चाची सूचना केली. 

विकासाच्या या प्रकल्पाला सर्वानीच विनातक्रार पाठिंबा देण्याची सूचना विक्रम पाटील यांनी तर वैभव पवार, अमित ओसवाल व चेतन शिंदे यांनी लवकरात लवकर प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा मांडली. भुयारी गटरमुळे शहरात आज आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, त्याकडे लक्ष देण्याची सूचना खंडेराव जाधव यांनी केली. शहाजी पाटील यांनी भुयारी गटर योजनेसारखे भाजी मंडईचे होऊ नये, सर्वांनी मिळून एकदम रक्कम उभी करून प्रकल्प पूर्ण करू, अशी सूचना केली. मंत्रालयात जाऊन 10 कोटी आणू, उगाच दिखाऊपणासाठी काही करायला नको. हे पैसे मागे जाणार नाहीत, गेल्यास राजीनामा देईन असा इशारा त्यांनी दिला. मात्र शेवटी नगराध्यक्षांनी आपल्या अधिकारात विषय मंजूर केला. 

उपसुचनेतील विषय 
खेड रस्त्यावरील स्मशानभूमी नूतनीकरण, विस्तारीकरण, शवदाहिनी, आष्टा नाक्‍यावरील माळी समाजाची स्मशानभूमी नूतनीकरण, माळ गल्ली व कापुसखेडनाका येथील स्मशानभूमी व मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचे नूतनीकरण, लिंगायत-तेली-वाणी समाजाच्या तसेच निनाईनगर स्मशानभूमीचे नूतनीकरण, जयंत पाटील सभागृह नूतनीकरण, आरक्षण क्रमांक 32 व 33 मध्ये सामाजिक सभागृह बांधणे आदी राष्ट्रवादाच्या उपसुचनेतील विषय होते.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Approved the subject of vegetable market, parking expenses in Islampur