शिक्षण संचालकांच्या मनमानीला चाप

शिक्षण संचालकांच्या मनमानीला चाप

सोलापूर- राज्यातील नऊ मेच्या शासन निर्णयातून वगळलेल्या 51 शाळा व 19 तुकड्यांच्या तपासणीमध्ये शिक्षण संचालकांनी मनमानी केली होती. शासनाने सांगितलेल्या मुद्यांच्या बाहेर जाऊन त्यांनी तपासणी केल्याने अनेक शाळा अपात्र झाल्या होत्या. या शाळांची तपासणी आता आयुक्त कार्यालयाकडून होणार असल्याने शिक्षण संचालकांच्या मनमानीला शासनाने चाप लावला आहे. 

"शिक्षण संचालकांचा मनमानी कारभार' याबाबतचे वृत्त "सकाळ'मध्ये 01 ऑक्‍टोबरला प्रसिद्ध झाले होते. त्या वृत्ताची दखल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही घेतली. काही शिक्षक आमदार व संघटनेच्या नेत्यांनी हा विषय शिक्षणमंत्र्यांच्या कानावर घातला. त्याचबरोबर शिक्षण विभागाच्या उपसचिवांनीही या वृत्ताची दखल घेतली. त्यामुळे या शाळांची तपासणी आयुक्त कार्यालयाने करून त्याचा अहवाल आठ दिवसात शासनास सादर करण्यास उपसचिवांनी सांगितले आहे. त्याबाबत आठ ऑक्‍टोबरला पत्र काढले आहे. त्यानुसार शाळांची तपासणी करण्यास सांगितले आहे. 

ज्या शाळांचा ऑनलाइन मूल्यांकन अर्ज नाही, जिल्हा मूल्यांकन समितीचा अहवाल नाही अशा शाळांची आयुक्त स्तरावर मूल्यांकन समिती नेमून त्या शाळांचे ऑफलाइन मूल्यांकन करण्यास सांगितले आहे. ज्या शाळांकडे शासनाचा मान्यता आदेश नाही पण शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांनी शासन आदेशाचा संदर्भ देऊन शाळेस मान्यता दिली आहे, अशा शाळांबाबत ज्या स्तरावर प्रथम मान्यता दिली आहे त्या कार्यालयात शासनाच्या मूळ आदेशाचा शोध घेण्यासही सांगितले आहे. शासन आदेश मिळत नसतील तर मूळ कागदपत्रांची तपासणी करावी. मात्र, त्यासाठी शाळेस अपात्र करू नये असेही सांगितले आहे. किरकोळ कारणांमुळे शिक्षण संचालकांनी शाळा अपात्र केल्या होत्या. पण, आता आयुक्त कार्यालयामार्फत शासनाने सांगितल्याप्रमाणे तपासणी होणार असल्याने शिक्षकांना दिलासा मिळणार आहे. 

"सकाळ'च्या वृत्तामुळे शिक्षण संचालकांची मनमानी थांबणार आहे. या वृत्ताने 15 वर्षापासून विनावेतन काम करणाऱ्या राज्यातील जवळपास एक हजार शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. हा विषय आमदार दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे यांनी शिक्षणमंत्र्यांना सांगितल्याने हा विषय मार्गी लागला. 
- गजानन खैरे, राजाध्यक्ष, मुप्टा महाराष्ट्र मराठी शाळा शिक्षक संघटना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com