आता थांबायचे नाही! - अर्चना जाधव

अर्चना जाधव
अर्चना जाधव

कोल्हापूर - वायरलेस, सीसीटीएनएसच्या कामापलीकडे जाऊन महिला पोलिस कर्मचारी चोरट्यांना पकडू शकतात. हे राजारामपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल अर्चना जाधव यांनी दाखवून दिले. ही तर सुरवात आहे, आता थांबायचे नाही, तर मिळालेल्या प्रोत्साहनाच्या शिदोरीवर पोलिस उपनिरीक्षक बनायचे, असे त्यांचे स्वप्न आहे. 

राजारामपुरी पोलिस ठाण्यात अर्चना हणमंत जाधव या मूळच्या कागलच्या. इयत्ता तिसरीत असताना त्यांच्या डोक्‍यावरून वडिलांचे छत्र गेले. आई शांता जाधव खचून गेल्या. त्यानंतर त्यांचे मामा व चुलते मदतीला धावून आले. त्यांनी आई, मोठी बहीण माधुरी या तिघांना लाखमोलाचा आधार दिला.

बघता बघता अर्चना जाधव यांनी बी. कॉम.ची पदवी घेतली. त्यांचा मावसभाऊ प्रवीण यांनी त्यांना पोलिस दलात भरतीचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी शारीरिक आणि लेखी परीक्षेची तयारी करून घेतली. २०११ मध्ये पोलिस भरतीत सहभागी झाल्या. परिश्रमामुळे जाधव यशस्वीरीत्या कोल्हापूर पोलिस दलात भरती झाल्या. 

भरतीनंतर खंडाळा येथे एक वर्षाचे प्रशिक्षण जाधव यांनी घेतले. येथे शारीरिक प्रशिक्षण व कायद्याचे ज्ञान आत्मसात केले. त्यानंतर २०१२ ला पोलिस मुख्यालय तर २०१५ मध्ये त्यांची राजारामपुरी पोलिस ठाण्यात बदली झाली. तत्कालीन पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकातून त्यांनी गांजा, दारू सेवन करणाऱ्या, तसेच छेडछाड करणाऱ्यांवर कारवाया केल्या. त्यानंतर पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी पोलिसांनी कायम डोळे आणि कान कायम उघडे ठेवावेत, असा कानमंत्र दिला. २२ ऑगस्टला राजारामपुरीतील एटीएम फोडण्याचा प्रयत्नात असणाऱ्या चोरट्याचा त्यांना संशय आला.

सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी त्याला पकडले. पोलिस निरीक्षक पाटील, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी त्यांचे कौतुक केले. इतकेच नव्हे तर पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी विशेष सत्कार करून मला प्रोत्साहन दिले. त्यांनी खात्यांतर्गत होणाऱ्या उपनिरीक्षक परीक्षेची तयारी सुरू केली आहे.

प्रसंगावधान राखून अर्चना जाधव यांनी शिताफीने गुन्हेगाराला पकडले. महिला केवळ कारकुनी कामच नव्हे, तर प्रत्यक्ष तपास व गुन्हेगारांना पकडण्याचेही कामही चांगल्याप्रकारे करू शकतात, हे यावरून सिद्ध होते. 
- औदुंबर पाटील, पोलिस निरीक्षक, राजारामपुरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com