सोलापूर महापालिका क्षेत्रात "डीपी' रस्त्यावरील अतिक्रमणाला चाप

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

महापालिकांनी तयार केलेल्या "डीपी' रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणांना आता चाप बसणार आहे. विकास आराखड्याच्या नकाशात दर्शविलेल्या रस्त्यांवर प्रत्यक्षात आखणी करण्याचे आदेश नगरविकास विभागाने महापालिकांना दिले आहेत.
 

सोलापूर- महापालिकांनी तयार केलेल्या "डीपी' रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणांना आता चाप बसणार आहे. विकास आराखड्याच्या नकाशात दर्शविलेल्या रस्त्यांवर प्रत्यक्षात आखणी करण्याचे आदेश नगरविकास विभागाने महापालिकांना दिले आहेत.

कोणत्याही शहराचा विकास आराखडा तयार करताना त्यातील "डीपी' रस्त्यांचा उल्लेख केवळ नकाशावर दाखविला जातो. मात्र दाखविण्यात आलेल्या जागेवर प्रत्यक्षात काय आहे याची कल्पना महापालिकेची यंत्रणा किंवा नागरिकांनाही नसते. दिसला मोकळा रस्ता की कर अतिक्रमण अशी सोलापुरातील स्थिती आहे. त्यातच हद्दवाढ भागातील मिळकतींवर काय आरक्षण आहे याची माहितीही संबंधित जमिनमालकाला नसते. त्यामुळे बिनधास्त प्लॅटविक्री केली जाते. ज्या वेळी "डीपी'रस्त्याचे आरक्षण असल्याचे समजते, त्यावेळी जागा घेतलेल्यांच्या पायाखालची वाळू सरकते. जागा मालक आणि विकत घेणाऱ्यांमध्ये वाद होतात. मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो. मात्र शासनाने आता घेतलेल्या निर्णयामुळे असे प्रकार थांबणार आहेत. त्यामुळे विकासाचा मार्गही मोकळा होणार असून, नागरिकांची फसवणूकही थांबणार आहे. 

विकास योजना तयार करतेवेळी किंवा त्यात बदल करतेवेळी नव्याने विकास योजनेतील रस्ते दाखविण्यात येतात. विकास योजनेतील रस्त्यांची प्रत्यक्ष जागेवर आखणी करण्यात आलेली नसते. त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे विकास योजनेतील रस्त्यांची जागेवर तातडीने आखणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आराखडे तयार केलेल्या महापालिकांनी तातडीने या आदेशाची कार्यवाही करावी, असेही या संदर्भातील आदेशात म्हटले आहे. 

शासनाने अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. त्याची आम्ही तातडीने कार्यवाही करीत आहोत. प्रत्यक्ष जागेवरल आखणी केल्यामुळे अतिक्रमण होण्याचे प्रकार थांबणार आहेत. - लक्ष्मण चलवादी, सहायक नगर रचना संचालक

Web Title: In the area of ​​Solapur MNP DP road encroachment are close