विजेच्या तारेला चिकटलेल्या आई - भावाची अरमानने केली सुटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

सांगली - अंगणात तारेवर कपडे वाळायला घालत असलेली आई अचानक किंचाळली. ती तारेला चिकटून तडफडू लागली होती. तिला वाचवण्यासाठी गेलेला अर्शदही संकटात खेचला गेला. ही घटना जवळच खेळणाऱ्या अरमानच्या लक्षात आली. त्याने जीवाची तमा न बाळगता तारेकडे धाव घेतली. तार फेकून त्याने दोघांना बाजुला केले. पण दोघांचे जीव वाचवण्याच्या प्रयत्नात तो मात्र स्वतः भाजला गेला.

सांगली - अंगणात तारेवर कपडे वाळायला घालत असलेली आई अचानक किंचाळली. ती तारेला चिकटून तडफडू लागली होती. तिला वाचवण्यासाठी अरमान आणि अर्शद हे धावले. पण यात अर्शदही संकटात खेचला गेला.  पण अरमानने जीवाची तमा न बाळगता तारेस बाजूला केले. पण दोघांचे जीव वाचवण्याच्या प्रयत्नात तो मात्र स्वतः भाजला गेला. 

अवघ्या एक - दोन मिनिटांचा जीवन - मरणाचा हा खेळ, साऱ्या गावकऱ्यांच्या अंगावर काटे आणणारा ठरला. अरमानने दाखवलेल्या धाडसाचे गेल्या शनिवारपासून कौतुक केले जात आहे. 

खानापूर तालुक्‍यातील मांगरुळ या छोटेखानी गावातली ही घटना. कमरुद्दीन मुल्ला, पत्नी बरकत, मुले अरमान व अर्शद असे चौकोनी कुटूंब. सकाळी बरकत अंगणात कपडे धुत होत्या. जवळच भावंडे खेळत होती. अरमान सहावीचा तर अर्शद चौथीचा विद्यार्थी. शनिवारी सकाळची शाळा सुटल्याने लवकरच घरी आले होते. कपडे वाळायला घालणारी आई अचानक तारेला चिकटल्याचे अरमानच्या लक्षात आले. शॉर्ट सर्किट झाल्याने तारेतून वीजप्रवाह वाहत होता. ओले कपडे हातात असलेल्या बरकत यांना वीजेचा जोरदार धक्का बसला. त्या तारेला चिकटल्याने ओरडू लागल्या.  कोणतीही तमा न बाळगता अरमान व अर्शद तिच्याकडे धावले. आईला ढकलून तारेपासून दूर केले. तिचा जीव वाचला; पण अर्शदच्या अंगावर तार पडली.  ती तार अरमानने अर्शदपासून बाजुला केली; पण तो स्वतः जखमी होऊन बेशुद्ध झाला. मायलेकांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावले. 

अरमानला विटा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. हातावर व पाठीवर भाजलेल्या अरमानची प्रकृती उपचारानंतर सावरली आहे. प्रसंगावधान दाखवून अरमानने केलेल्या धाडसाला गावकऱ्यांनी सलाम केला.

खानापूर बाजार समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते रामराव पाटील, खानापूर पंचायत समितीच्या सभापती मनीषा बागल, उपसभापती नलवडे तसेच सरपंचांनी अरमानचा सत्कार केला. शाळेत गटशिक्षणाधिकारी व शिक्षकांनी गौरवले. 

"अरमानचे धाडस आणि प्रसंगावधान वाखाणण्याजोगे आहे. त्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जावी यासाठी पाठपुरावा करणार आहोत.' 
- सुहास बाबर,
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद. 

"अरमानने दाखवलेले शौर्य दुर्मिळ आणि कौतुकास्पद आहे. त्याची शिफारस राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी करणार आहोत' 
- अनीस नायकवडी,
गटशिक्षणाधिकारी, खानापूर 
 
"मुलाचा जन्म म्हणजे आईसाठी पुनर्जन्मच म्हणतात; पण अरमानने खऱ्या अर्थाने सिद्ध केले. माझा जीव वाचवून नवा जन्म दिला'. 
- बरकत मुल्ला, आई 

Web Title: Arman Saved his Mother and brother