घोडेगावजवळ पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा

Armed robbery at a petrol pump near Ghodegaon
Armed robbery at a petrol pump near Ghodegaon

नेवासे : तालुक्‍यातील घोडेगाव शिवारात नगर-औरंगाबाद महामार्गावरील पेट्रोल पंपावर आज पहाटे पावणेचारच्या सुमारास दहा-पंधरा जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा टाकून 25 हजार रुपयांच्या रोकडसह 39 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला.

दरोडेखोरांनी पंपावर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक आदिनाथ नामदेव आढाव (रा. लोहगाव) यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत माहिती अशी ः घोडेगाव शिवारात नगर-औरंगाबाद महामार्गावर एम. टी. पागिरे यांच्या पेट्रोल पंपावर पहाटे पावणेचारच्या सुमारास दहा ते पंधरा दरोडेखोर आले. त्यांचे चेहरे रुमालाने झाकलेले आणि हातात कोयते, कुऱ्हाडी, काठ्या होत्या. पंपावरील सर्व कर्मचाऱ्यांना पंप कार्यालयात कोंडून मारहाण केली आणि 25 हजार रुपयांची रोकड आणि तीन मोबाईल असा 39 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांच्या मारहाणीत अंकुश विष्णू गाळे (वय 26, रा. मिरी, ता. पाथर्डी), सुरेश रामभाऊ शिंदे (वय 40, रा. मांडेगव्हाण, ता. नेवासे) या कर्मचाऱ्यांसह मच्छिंद्र तान्हाजी आगरकर (ट्रकचालक, वय 52, रा. चाकण, जि. पुणे) गंभीर जखमी झाले. त्यांना शनिशिंगणापूर येथील शनैश्‍वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या इतर वाहनांतील चालकांनाही या दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली.


घटनेची माहिती समजताच श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे, शेवगावचे पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नेवाशाचे पोलिस निरीक्षक रणजित डेरे, शनिशिंगणापूरचे निरीक्षक राजेंद्र चव्हाण आणि सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर थोरात यांच्या पथकांसह जिल्हा गुन्हे शाखेचे पथक दरोडेखोरांच्या शोधासाठी राहुरी व परिसरात रवाना झाले आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com