नौशेरा सेक्टरमध्ये अतिरेक्‍यांशी लढताना नगरचे जवान हुतात्मा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

जम्मू-काश्‍मीरमधील नौशेरा सेक्‍टरमध्ये अतिरेक्‍यांशी लढताना मंगळवारी दुपारी तीन वाजता दहेगाव बोलका येथील नायब सुभेदार सुनील रावसाहेब वलटे (वय 38) यांना वीरमरण आले. भारतीय लष्करात "मराठा रेजिमेंट 24 बटालियन'मध्ये ते कार्यरत होते.

कोपरगाव : जम्मू-काश्‍मीरमधील नौशेरा सेक्‍टरमध्ये अतिरेक्‍यांशी लढताना मंगळवारी दुपारी तीन वाजता दहेगाव बोलका येथील नायब सुभेदार सुनील रावसाहेब वलटे (वय 38) यांना वीरमरण आले. भारतीय लष्करात "मराठा रेजिमेंट 24 बटालियन'मध्ये ते कार्यरत होते. त्यांच्या मागे आई सुशीला, वडील रावसाहेब, भाऊ अनिल, बहीण, पत्नी मंगल, मुलगा वेदांत व मुलगी श्रद्धा, असा परिवार आहे. हुतात्मा वलटे यांचे पार्थिव आज रात्री नऊ वाजता पुण्यात आणले जाण्याची शक्‍यता आहे. 

हुतात्मा सुनील यांचे वडील रावसाहेब जनार्दन वलटे दहेगाव बोलका येथे शेतीव्यवसाय करतात. सुनील यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण वीरभद्र विद्यालय, दहेगाव येथे झाले होते. दहावीनंतर त्यांनी संजीवनी प्री-कॅडेट ट्रेनिंग सेंटर येथे सैन्यभरतीपूर्व प्रशिक्षण घेतले. 1999मध्ये भारतीय लष्करात शिपाई पदावर ते भरती झाले. जम्मू-काश्‍मीरमधील श्रीनगरमध्ये 12 वर्षे त्यांनी सेवा केली. सैन्यदलात त्यांची एकूण 20 वर्षे सेवा झाली. सध्या ते जम्मू-काश्‍मीरच्या नौशेरा सेक्‍टरमध्ये कार्यरत होते. 

हुतात्मा सुनील यांची मुलगी राष्ट्रसंत जनार्दनस्वामी आश्रमात "सीबीएसई' माध्यमात आठवीत शिकते. मुलगा संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकतो. पत्नी मंगल गृहिणी आहेत. सुनील वलटे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आदींनी हुतात्मा सुनील यांना श्रद्धांजली अर्पण केली. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने दहेगाव बोलका परिसरात शोकाकूल वातावरण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An army personnel from nagar died while fighting with terrorist in naushera sector