शॉर्टफिल्ममधून व्यक्त होतेय तरुणाई; 'या' जिल्ह्यात वर्षभरात बनताहेत 50 शॉर्टफिल्म्स!

Short-Flims
Short-Flims

सोलापूर : सैराट, फँड्री यासह विविध छोट्या-मोठ्या स्थानिक चित्रपटांमुळे सोलापूरचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. उद्योग, व्यवसायानंतर आता सोलापूर चित्रपटनिर्मिती क्षेत्रातही गगनभरारी घेत आहे. तसेच अनेक दर्जेदार लघुपटांची निर्मितीही होत असून सोलापुरातील कलाकारांनी 'हम किसी से कम नही' म्हणत अनेक पुरस्कारप्राप्त लघुपटांची निर्मिती केली आहे. सोलापुरात वर्षभरात 50 लघुपट बनविले जात आहेत. 

नागराज मंजुळे यांनी 'पिस्तुल्या'मधून एका पाच-सहा वर्षांच्या मुलाची शिक्षणाविषयी असणारी तळमळ दाखवली. पूर्वी एखादा चित्रपट बनवायचं म्हटलं की मोठमोठे कॅमेरे, कलाकार, विविध तंत्रज्ञ आणि मनुष्यबळ आणि सर्वांत महत्त्वाचा पैसा या सर्व गोष्टींचा विचार करावा लागत असे; परंतु आता स्मार्टफोनचा वापर करून अगदी शून्य रुपये खर्च करूनही एखादी उत्तम शॉर्टफिल्म बनवता येत आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक तरुण या क्षेत्रात उत्साहाने कार्यरत आहेत. 

'काही वर्षांपूर्वी चित्रपट निर्मितीची प्रक्रिया म्हणजे खूप किचकट आणि कठीण गोष्ट मानली जात असे. अलीकडे इंटरनेटवर मिळणाऱ्या विविध प्रकारच्या माहितीचा उपयोग करून कोणीही शॉर्टफिल्म बनवू शकत आहे. त्यासाठी कोणत्याही फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन फिल्म मेकिंगचा कोर्स शिकण्याची गरज नाही', असे डॉ. कुणाल शिंदे यांनी सांगितले. 'भले सिनेमाचं औपचारिक शिक्षण नसले तरी चालेल, पण त्याचा दर्जा चांगला ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या सिनेमाच्या पुढे आपल्या शहराचेही नाव लागत असतं, याचं भान तरुणांनी असू द्यावे', असे दिग्दर्शक संदीप जाधव यांचे म्हणणे आहे. 

'तांत्रिक साधनांची उपलब्धता वाढली आहे. अगदी मोबाईलवरसुद्धा सहजपणे चित्रीकरण करता येण्याची सोय झाली असल्यामुळे चित्रपट माध्यमाची आवड असणाऱ्या प्रत्येकाला आपण एखादी तरी शर्टफिल्म बनवावी असे वाटत आहे. फेसबुक किंवा यू-ट्यूबसारख्या प्रसारमाध्यमातून शॉर्टफिल्म लोकांपर्यंत पोचवली जात आहे. यातून आर्थिक फायद्याचा विचार अनेकजण करत नाहीत. केवळ हौस म्हणून लघुपट निर्माण करण्यापेक्षा होतकरू तरुणांनी या माध्यमाकडे गांभीर्याने पाहिलं तर लघु प्रमाणात पण दर्जेदार लघुपट निर्माण होतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही', असे व्हिडिओ एडिटर सचिन जगताप यांनी सांगितले. 

सोलापुरातील गाजलेले लघुपट 

पिस्तुल्या, खेळ मांडला, बालविवाह, जन्मजात, कॅप्टिव्हिटी, तह, संचारबंदी, ले पॅपिलॉन, मसालेभात, जय हे, सुरवात, स्वच्छ भारत अभियान, आयडेंटिटी, गिफ्ट, ब्रीफकेस, मतदार जनजागृती. 

लघुपट निर्मिती क्षेत्रात यांनी मिळवले यश 

नागराज मंजुळे, अमर देवकर, संदीप जाधव, डॉ. दिनेश रसाळ, रत्नाकर जाधव, राहुल चवरे, संभाजी जाधव, अक्षय इंडीकर, किशोर लोंढे. 

- मराठमोळ्या 'हिरकणी'ला आशादीदींचे चारचाँद!

समाजातल्या विविध समस्या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून मांडल्या जात आहेत. यामुळे समाजप्रबोधनाचे महान कार्य घडत आहे. मेडिकलचे शिक्षण घेत असताना मी लघुपटनिर्मितीचा छंद जोपासला आहे. आज अनेक युवा फिल्म मेकर्स आपल्या टॅलेंटचा वापर करून तळागाळातील लोकांच्या व्यथा समाजापुढे मांडत आहेत, त्यांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. 
- कुणाल शिंदे, लघुपट निर्माता 

जगभरात निर्माण होणाऱ्या चांगल्या कलाकृती पाहणं ही लघुपटनिर्मितीची पहिली पायरी असू शकते. शॉर्टफिल्म म्हणजे कॅमेरा, एडिटिंगचा खेळ नसून एखादा छोटासा आशय किंवा लघुकथा मोजक्‍या वेळेत प्रभावीपणे मांडण्याचं सशक्त माध्यम आहे. याची जाणीव लघुपटनिर्मिती करणाऱ्या होतकरूंना व्हायला हवी. 
- सचिन जगताप, व्हिडिओ एडिटर 

लघुपटांच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करता येत आहेत. आपल्यातील संवेदनशीलता जपताना अनेक तरुण भावनिक आणि आशयघन विषयांना हात घालताना दिसत आहेत. तरुणांच्या डोक्‍यात खूप भन्नाट कल्पना येतात. परंतु, त्या पडद्यावर साकारताना त्यांची तारांबळ उडते. हे टाळण्यासाठी या माध्यमाचं व्याकरण आत्मसात करायला हवं. 
- संदीप जाधव, दिग्दर्शक 
 
सोलापूरसारख्या शहरातून युवक मोठ्या प्रमाणात लघुपटनिर्मिती करत आहेत. आपण जो विषय मांडत आहोत, त्यातून आपल्या शहराची अतिशयोक्तीने मांडणी तर केली जात नाही ना, याचा विचार तरुणांनी करायला हवा. या क्षेत्रातील अभ्यासकांनी फिल्म क्‍लबची स्थापना करून तरुण कलाकारांना मार्गदर्शन करावे. 
- शिवकुमार देडे, व्हिजेबल फीचर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com