Video : #KolhapurFloods कोल्हापूरजवळ सुमारे ७ हजार वाहने अडकून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा येथून पूराच्या एक ते दीड फूट पाण्यातून जीवनावश्यक वस्तू व अवजड वाहतूक आज सकाळी नऊ वाजता सुरू केली; मात्र इतर वाहतूक महामार्गावरून बंदच आहे.

शिरोली पुलाची - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा येथून पूराच्या एक ते दीड फूट पाण्यातून जीवनावश्यक वस्तू व अवजड वाहतूक आज सकाळी नऊ वाजता सुरू केली; मात्र इतर वाहतूक महामार्गावरून बंदच आहे. 

आज सकाळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, आमदार अमल महाडिक, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण भोसले आदींनी महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर अत्यावश्यक सेवा व अवजड वाहतूक सुरू केली. गेल्या सहा दिवसांपासून महामार्ग वाहतुकीला बंद करण्यात आल्याने सुमारे सात हजार वाहने रस्त्याच्या दुतर्फा अडकून आहेत. पाण्याची पातळी दुपारपर्यंत आणखी ओसरेल. त्यानंतर रस्त्यात अडकलेल्या वाहनांबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

महामार्गावरून वाहणाऱ्या पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे सांगली फाटा येथील महामार्गावरून सुमारे एक ते दीड फूट पाण्यातून जीवनावश्यक वस्तू व अवजड वाहतूक सुरू केली आहे; मात्र कार व इतर वाहनांची वाहतूक सुरू नाही. महामार्ग सुरु झाल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Around Seven thousand vehicles stranded near kolhapur