कोल्हापूरची अर्पिता बनली चक्क ‘फायरमन’

अमृता जोशी
रविवार, 9 एप्रिल 2017

आत्मविश्‍वासाच्या बळावर मिळवले यश - तरुणींसाठी वेगळ्या करिअरचा मार्ग

कोल्हापूर - डिग्री घ्यायची आणि किमान पाच लाखांच्या पॅकेजची कॉर्पोरेट क्षेत्रातील उंची नोकरी मिळवायची, असे स्वप्न ठेवून अनेकजण आटापिटा करतात; पण हे करणे शक्‍य असूनही कोल्हापूरच्या अर्पिता शेलार यांनी वेगळी वाट निवडत चक्क अग्निशमन दलात ‘फायरमन’ची नोकरी स्वीकारली. राज्यात केवळ दोनच महिला या पदावर आहेत. आणीबाणीच्या स्थितीत अग्निशामक बंबासह घटनास्थळी पोचून त्या जिगरबाजपणे ‘संकटमोचक’ म्हणून जबाबदारी निभावत आहेत.  

अर्पिता शेलार या महापालिकेच्या शाहू जलतरण तलावात प्रशिक्षक म्हणून काही वर्षांपूर्वी कार्यरत होत्या. काहीतरी वेगळं करायचं म्हणून फायरमनचं प्रशिक्षण घेतलं. प्रत्यक्ष आग विझविणे, वायुगळती रोखणे, अपघातात सापडलेल्यांची सुटका करणे अशा कामात त्यांनी न डगमगता स्वतःला सिद्ध केले. त्यासाठी त्यांना खडतर प्रशिक्षणातून जावे लागले.

बहुतांशी ठिकाणी नोकरीसाठी मुलाखतीवेळी शेकडो स्पर्धक असतात; परंतु अर्पिता यांनी निवडलेल्या क्षेत्रात त्यांना एकही महिला स्पर्धक नव्हती. कोल्हापूर महापालिकेत या पदासाठी झालेल्या निवड चाचणीत पुरुष उमेदवारांसाठी असलेल्या निकषांवर त्यांचे मूल्यांकन झाले. तेथे तांत्रिकदृष्ट्या त्या अयशस्वी झाल्या; पण तत्कालीन महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी त्यांची प्रशिक्षणातील गुणवत्ता पाहून संधी दिली आणि थेट फायरस्टेशनला रुजू झाल्या.

गेली चार वर्षे अनेक आगीच्या, अपघातांच्या घटनांवेळी पुरुष सहकाऱ्यांप्रमाणेच त्याही पाइप टाकणे, शिडी अँगल करणे, वॉटर फायरिंग करणे आणि आगीच्या ज्वालांत अडकलेल्यांना बाहेर काढणे, यासाठी थरारक धावपळ करतात. चार वर्षांपासून त्या यशस्वीपणे कामगिरी बजावत आहेत. सुरवातीला त्यांच्याबाबत ‘अग्निशमन दलात महिला’ असा आश्‍चर्यचकित भाव व्यक्त झाला. त्यांची ही धडाडी अनेक युवती, महिलांना प्रेरणादायी ठरत आहे. 

आग लागलेल्या ठिकाणी अनेकदा महिला अडकलेल्या किंवा भाजलेल्या असतात. त्यांची सुटका करून त्यांना धीर देणे महत्त्वाचे असते. अशा ठिकाणी महिला प्रभावीपणे काम करू शकतात. महाविद्यालयात असताना माझे पोलिस होण्याचे स्वप्न होते; पण अग्निशामक दलाची वर्दी चढविल्यानंतरही तितकाच अभिमान वाटला. एक महिला म्हणून सक्षम झाल्यामुळे आत्मविश्‍वास वाढला आहे. 
- अर्पिता शेलार

Web Title: arpita shelar fireman