गोळीबारातील फरार आरोपी गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

राहात्यात पोलिसांवर गोळीबार करणारा कुख्यात आरोपी सचिन ताके याच्या पसार साथीदारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज जेरबंद केले.

नगर : राहात्यात पोलिसांवर गोळीबार करणारा कुख्यात आरोपी सचिन ताके याच्या पसार साथीदारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज जेरबंद केले. अमित विजय सांगळे (वय 35, रा. तळेगाव ढमढेरे, पुणे) असे त्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने अवघ्या पाच दिवसांत फरार आरोपी पकडला. 

राहाता शहरात बुधवारी (ता. 20) गंठणचोरीच्या संशयावरून पोलिस कर्मचारी रशीद बादशहा शेख व अजित पटारे यांनी मोटरसायकलवर जाणाऱ्या दोघांना अडविले. शहरातील गजबजलेल्या चितळी रस्त्यावर मोटरसायकलच्या मागे बसलेला सचिन ताके (रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर) या सराईत गुन्हेगाराने केलेल्या गोळीबारात पोलिस शिपाई अजित अशोक पठारे जखमी झाले होते. मात्र, अशाही परिस्थितीत जखमी पठारे व त्यांच्यासोबत असलेले पोलिस कॉन्स्टेबल रशीद शेख यांनी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने ताकेला पकडले. त्याच्यासोबत असलेला अन्य आरोपी मात्र पसार झाला होता. 

गजबजलेल्या रस्त्यावर दिवसाढवळ्या पोलिसांवर झालेल्या या गोळीबारामुळे शहरात खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास चितळी रस्त्यावर ही घटना घडली. पठारे व शेख कार्यालयीन कामानिमित्त चितळी रस्त्याने मोटरसायकलवरून चालले होते. त्या वेळी त्यांना एका मोटरसायकलवर बसलेले व चेहऱ्याला रुमाल बांधलेले दोन तरुण दिसले. सोनसाखळी चोर असावेत असा संशय आल्याने पोलिस शिपायांनी त्या मोटरसायकलसमोर आपली मोटरसायकल आडवी लावली. त्यांची चौकशी सुरू केली. 

पठारे यांनी खाली उतरून मोटरसायकलवर मागे बसलेल्या ताके यास पकडण्याचा प्रयत्न करताच, त्याने गावठी पिस्तुलातून त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक पठारे यांच्या हाताला आणि दुसरी गालाला चाटून गेली. ते खाली पडले; मात्र आरोपी ताकेचा पाय त्यांनी घट्ट धरून ठेवला. पोलिस शिपाई शेख यांनीही त्याला पकडून धरले. पोलिसांच्या मदतीला रस्त्यावरील लोक धावले. या गडबडीत दुसरा आरोपी पळून गेला. 

गोळीबारात जखमी झालेल्या पठारे यांच्यावर शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रीरामपूरच्या अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे व पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. 

या घटनेतील फरार आरोपी तळेगाव ढमढेरे (पुणे) येथील रहिवासी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने तळेगाव ढमढेरे येथे सापळा रचून त्यास जेरबंद केले. सचिन ताके याच्या समवेत संगमनेरमध्ये तीन, तर लोणी (ता. राहाता) परिसरात दोन ठिकाणी गंठणचोरी केल्याची कबुली त्याने दिली. अधिक तपासासाठी त्यास राहाता पोलिसांकडे देण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested accused in firing