सांगलीत ४५० टन बेदाणा आवक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

सांगली - दिवाळीनंतर मार्केट यार्डात आठवड्यापासून बेदाणा सौदे सुरू झाले आहेत. दरात देखील वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे चित्र आहे. काल झालेल्या सौद्यात ४५ गाड्यांमधून सुमारे ४५० टन बेदाणा आवक झाली. २४१ रुपयांपर्यंत दर दिला गेला.

सांगली - दिवाळीनंतर मार्केट यार्डात आठवड्यापासून बेदाणा सौदे सुरू झाले आहेत. दरात देखील वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे चित्र आहे. काल झालेल्या सौद्यात ४५ गाड्यांमधून सुमारे ४५० टन बेदाणा आवक झाली. २४१ रुपयांपर्यंत दर दिला गेला.

दिवाळीपूर्वी मार्केट यार्डात झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये २१० रुपयांपर्यंत भाव गेला होता. दिवाळीपूर्वी बेदाण्याची मागणी जादा असल्यामुळे दर वाढेल अशी आशा होती, परंतु फारशी वाढ झाली नाही. त्यामुळे दिवाळीनंतरच्या सौद्यांकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. मागील आठवड्यात बुधवारी दिवाळीनंतरचा पहिला बेदाणा सौदा झाला. तेव्हा १५ गाड्यांमधून १५० टन बेदाणा आवक झाली होती. चांगल्या प्रतीच्या बेदाण्यास २४३ रुपयांपर्यंत भाव मिळाला. 

कालच्या बुधवारच्या सौद्यासाठी जत-कर्नाटक  परिसरातील बेदाण्याची आवक झाली होती. ४५ गाड्या सौद्यासाठी आल्या होत्या. कालच्या सौद्यात २४१ रुपयांपर्यंत भाव मिळाला. भाव वाढल्यामुळे पुढील सौद्यात आवक वाढेल अशी परिस्थिती आहे. सौद्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडून बेदाणा घेतला जातो त्यांना दिवाळीच्या सुटीत वर्षभरातील हिशेब देण्याचा नियम आहे.

त्यानुसार वर्षभरात ज्या शेतकऱ्यांकडून बेदाणा घेतला जातो, त्यांना दिवाळीपूर्वी बिल मिळते. दिवाळीपूर्वीच सर्व देणी भागवली पाहिजेत असा नियम आहे. दिवाळीनंतरही ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची  रक्कम थकीत ठेवली आहे, अशांना दिवाळीनंतरच्या सौद्यात भाग घेता येत नाही. व्यापारी आणि शेतकरी यांच्यात विश्‍वासपूर्ण नाते टिकले जावे यासाठी हा निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यात थकीत बिलाबाबत आढावा घेतल्यानंतर १५ व्यापाऱ्यांनी दिवाळीपूर्वी बेदाण्याची रक्‍कम दिली नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्या व्यापाऱ्यांना सौद्यात भाग घेण्यास मनाई  केली गेली. काल (ता.५) झालेल्या सौद्यावेळी ‘बॅन’ घातलेले कोणीही व्यापारी उपस्थित नव्हते.

Web Title: Arrival of 450 tonnes of raisin in Sangli