कृत्रिम घरट्यांतून चिमण्यांचे संवर्धन यशस्वी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

सातारा - वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. मात्र, याही परिस्थितीत कृत्रिम घरट्यांद्वारे चिमण्यांचे संवर्धन करण्याचा अभिनव उपक्रम सातारा शहर आणि परिसरात पक्षीप्रेमी रवींद्र शिंदे यांनी राबविला आहे. गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी दीड हजार घरट्यांचे मोफत वाटप केले असून, त्यापैकी 900 घरट्यांत चिमण्या आज राहण्यास आल्या आहेत. त्यामध्ये सकाळ माध्यम समूहाचे मोलाचे सहकार्य लाभल्यामुळे आज चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा एकदा कानावर पडू लागला आहे. 

निसर्गरम्य वातावरण, वाडे व कौलारू घरांमुळे शहरात चिमण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात होते. वाडे व कौलारू छतांच्या अडगळीत चिमण्यांना घरटी बांधण्याची संधी होती. परंतु, शहरीकरणामुळे कौलारू घरे जाऊन त्या जागी सिमेंटच्या इमारती उभ्या राहिल्याने चिमण्यांना घरटी बांधावयास जागाच राहिली नाही. त्यातच वृक्षतोडीमुळे चिमण्यांची अडचण झाली. मात्र, निसर्ग साखळीतील एक घटक असलेल्या चिमण्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी पक्षीप्रेमी रवींद्र शिंदे यांनी सामाजिक जाणिवेतून मोफत घरटी वाटप करण्याचा निर्धार केला. गेल्या वर्षभरात त्यांनी दीड हजार घरटी मोफत वाटली आहेत. या घरट्यांपैकी 900 घरट्यांत चिमण्या राहण्यास आल्या आहेत. चिमणी संवर्धनाचा हा त्यांचा उपक्रमात सकाळ माध्यम समूहाने उचलून धरला. घरटी बनविण्यासाठी लागणारे प्लायवुड, फेव्हिकॉल व इतर साहित्य सामाजिक भावनेतून काही कंपनी, संस्था व व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचा हात दिला. 

श्री. शिंदे यांनी स्वत: दीड लाख रुपये खर्च करून घरटी बनवून ती मोफत वाटली आहेत. चिमणी संवर्धनाचा त्यांचा हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे. पण, घरटी बनविण्यासाठी लागणारे साहित्य मिळण्यात अडचणी येत आहेत. साधारण एका घरट्यासाठी 125 रुपये खर्च येत आहे. त्यामुळे दानशूर व्यक्ती, संस्था, संघटनांनी पुढे येऊन साहित्य उपलब्ध करणे गरजेचे आहे. आतापर्यंत श्री. शिंदे यांना कूपर उद्योग समूहातील दोन अधिकारी व रोटरी क्‍लबने मदत केली आहे. 

घरट्यासाठी संपर्क साधा 

रवींद्र शिंदे यांनी तयार केलेल्या घरट्यांचा नागरिकांनी योग्य वापर करावा, एवढीच अपेक्षा आहे. चिमणीच्या घरट्यासाठी इच्छुक नागरिकांनी श्री. शिंदे : 9422404799 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच सायंकाळी सात ते नऊ या वेळात रवींद्र शिंदे, 92 ए, शुक्रवार पेठ, सातारा येथे संपर्क साधावा. 

सकाळ माध्यम समूह व तनिष्का गटांची साथ 

पक्षीमित्र रवींद्र शिंदे यांनी चिमण्यांसाठी मोफत कृत्रिम घरटे तयार करून जणू "या चिमण्यांनो, परत फिरा रे' अशी आर्त हाक दिली. या हाकेला सकाळ माध्यम समूह व तनिष्का गटांची साथ मिळाली. तनिष्का गटांनी तर चिमणी संवर्धनासाठी मोफत चिमणीची घरटी वाटपाचा उपक्रम राबविला. त्यामुळे दुर्मिळ झालेल्या चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा एकदा शहर व परिसरात ऐकू येऊ लागला आहे. 

Web Title: Artificial nest box sparrow conservation success