येत्या पंधरा दिवसांत राज्यात बरसणार कृत्रिम पाऊस!

येत्या पंधरा दिवसांत राज्यात बरसणार कृत्रिम पाऊस!

सोलापूर : पावसाळा सुरु होऊन दिड महिन्याचा काळ लोटला तरीही कोकण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरित भागात वरुणराजाने दडी मारली आहे. त्यामुळे मूग, उडीद, मटकी पेरणीचा कालावधी संपला आहे. तर तूर, बाजरीला पावसाची प्रतीक्षा आहे.

या पार्श्‍वभूमीवर राज्यात वीस ते पंचवीस जुलै दरम्यान कृत्रिम पावसाचा यावर्षीचा पहिला प्रयोग याच कालावधीत करण्याची तयारी युध्दपातळीवर सुरु असल्याची माहिती मदत आणि पुनवर्सन विभागाने दिली. त्यामुळे सोलापूर, औरंगाबाद आणि मुंबई या रडार केंद्राच्या दोनशे किलोमीटर परिसराला याचा फायदा होईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे. 

राज्यात सरासरीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी राहील असा हवामान खात्याने अंदाज व्यक्‍त केला असतानाही सुरवातीच्या काळात राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याकरिता ठोस हालचाली केल्या नाहीत. तत्पूर्वी, अर्थसंकल्पात मंजूर केलेला निधी आणि कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी लागणाऱ्या परवानग्याही वेळेवर मिळाल्या नसल्याने विलंब लागल्याची माहिती मदत आणि पुनवर्सन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

मात्र, मागील दिड महिन्यात सोलापूर, उस्मानाबाद, बीड, पुणे, औरंगाबाद यासह अन्य जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस पडल्याने बळीराजाची चिंता वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे वीस जुलै ते सप्टेंबरअखेर असे कृत्रिम पावसाचे प्रयोग केले जाणार आहेत. त्यासाठी संबंधित जिल्ह्याची विमाने मुक्‍कामी पाठवण्यात येतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

"औरंगाबाद, मुंबई आणि सोलापूर या तीन ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याचे रडार बसवण्यात आले आहेत. राज्यातील पावसाने दडी मारल्याने कृत्रिम पाऊस पाडण्याकरिता राज्य सरकारकडून 30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 20 ते 25 जुलै दरम्यान राज्यभरात ढगाळ वातावरणाची शक्‍यता असल्याने या कालावधीत कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन करण्यात येत आहे." - श्रीरंग घोलप, अतिरिक्‍त सचिव, मदत व पुनवर्सन विभाग, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com