पोषक वातावरण नसल्याने कृत्रिम पाऊस लांबणीवर

भारत नागणे
शुक्रवार, 26 जुलै 2019

गेल्या आठ दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी पोषक वातावरण तयार होत नसल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर पडला आहे.

पंढरपूर : दुष्काळी सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार सोलापूरच्या विमान तळावर गेल्या दहा दिवसांपासून आवश्यक ती यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी पोषक वातावरण तयार होत नसल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर पडला आहे. याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चिंता व्यक्त केली.

आकाशात पावसाचे ढग तयार होत नसल्याने कृत्रिम पावसासाठी राज्य सरकारचा सुमारे 30 कोटींचा खर्च वाया जातो की काय अशीच आता भीती व्यक्त केली जात आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून सोलापूरसह मराडवाड्यात दुष्काळीस्थिती आहे. यावर्षीही या भागात पावसाने दडी मारली. ऐन पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्यात सुमारे 300 हून अधिक पाण्याचे टँकर तर 350 चारा छावण्या सुरू आहेत.

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 22 जुलै रोजी कृत्रिम पाऊस पाडण्याची घोषणा केली होती. त्यादृष्टीने सर्व ती आवश्यक यंत्रणा ही सज्ज ठेवण्यात आली आहे. परंतु 22 व 23 जुलै रोजी  कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानाने आकाशात झेप घेतली, दोन तासांच्या प्रवासा नंतर विमान रिकाम्या हाताने परत आले.

गेल्या सहा ते सात दिवसांपासून आकाशात ढग येतात तेही बिन पाण्याचे त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर पडला आहे.
या संदर्भात सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पोषक हवामान  नसल्यानेच कृत्रिम पावसाला  विलंब होत असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ऑगस्टपर्यंत जनावरासांठी चारा छावण्या आणि पाण्याचे टॅकर सुरू ठेवण्यात येतील असेही सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले.

पंढरपूर तालुक्यातील चिंचणी येथे वृक्ष लागवड व संवर्धन या चर्चा सत्राचे उद्घाटनासाठी मंत्री देशमुख आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कृत्रिम पाऊसाला विलंब होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artificial rainfall delays due to lack of nutrient environment