चित्रकलेने संसारात भरले यशाचे रंग

शिवाजी यादव
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

चित्रकला आमच्या ३० वर्षाच्या संसाराला यशस्वी करीत राष्ट्रीय स्तरावर पोहोचली, देशभर कौतुक झाले. अरुणकुमार पोतदार यांनी ३० वर्षांच्या यशस्वी संसाराची यशकथा दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने ‘सकाळ’शी बोलताना उलगडली.

कोल्हापूर - कोणतीही कला मन प्रसन्न करते, नवनिर्मितीला ऊर्जा आणि बळ देते, हा विश्‍वास अरुणकुमार पोतदार व त्यांच्या पत्नी अस्मिता यांनी जपला. सांसारिक जबाबदाऱ्या पेलताना किंवा व्यक्तिगत आयुष्यात येणारी संकटे, नैराश्‍याला दूर ठेवण्याची ताकद या कलेतून मिळवली. कलेच्या रूपातून मिळालेल्या संयम, तडजोड, समजुतीचे रंग संसारात भरले तसा संसार नटला, सजला, बहरला. त्यासोबत आनंदी जगण्याचा कलामंत्र मिळाला. चित्रकला आमच्या ३० वर्षाच्या संसाराला यशस्वी करीत राष्ट्रीय स्तरावर पोहोचली, देशभर कौतुक झाले. अरुणकुमार पोतदार यांनी ३० वर्षांच्या यशस्वी संसाराची यशकथा ‘सकाळ’शी बोलताना उलगडली. 

श्री. पोतदारांचे मूळ गाव कसबा तारळे (ता. राधानगरी). वडील सोनार काम करीत. त्यांच्या सोबतीने ते कोल्हापुरात आले. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेतले. आयटीआयमध्ये आरेखक ट्रेड केला. तिथच आडव्या, उभ्या रेषा, नक्षीकाम कलेशी गट्टी जमली. 

पुढे खासगी कंपनीत नोकऱ्या केल्या, कृषी विभागात १९८३ मध्ये आरेखक म्हणून शासकीय सेवेत आले. अनुरेखक असे त्यांचे पद चित्रकलेशी संबंधित होते. पुढे औंध खटाव, शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड, कागल, करवीर व जिल्हा कार्यालयात नोकरी करून २०१६ ला सेवानिवृत्त झाले. 

या काळात पत्नी अस्मिता यांची साथ लाभली, अस्मिता यांचे माहेर कऱ्हाड. त्या एटीडी झालेल्या. चित्रकलेत निष्णात होत्या. हस्तकलेतील काही काम होते. विद्यापीठ शिक्षण संस्थेने कलाशिक्षिका म्हणून त्यांना संधी दिली. नोकरदार म्हणून दोघे सुखी होतो. तरीही अनेक प्रसंगातून संघर्ष वाट्याला यायचा. कुरबुरी व्हायच्या, संसारात ताण वाढत होता. मात्र तो हलका करण्यासाठी अस्मिता यांनी चित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. कलासाधनेत कोणी कोणाला व्यत्यय आणायचा नाही, असे सूत्र दोघांनी ठरविले ते आजपर्यंत जपले.

काढलेल्या चित्रांची प्रदर्शने सुरू झाली. वेगळी वाट म्हणून भरतकाम सुरू केले. एकच भरतकामाचे एक पोट्रेट करण्यात अस्मिता यांना  सहा महिने दिवस-रात्र मेहनत घ्यावी लागली. त्याच भरतकामाच्या पोट्रेटेला केंद्र सरकारचा उत्कृष्ट कला पुरस्कार मिळाला. आणि भरत कामातील महाराष्ट्रीय कलाकुसर पोट्रेट माध्यमातून पहिल्यांदाच देशभरातील कलावंतांसमोर आली. तत्कालीन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते दिल्लीत पुरस्कार वितरण झाले. 

इतक्‍या वर्षांच्या संसारात कलेला प्रोत्साहन देत आलो, त्याचे ते फलित होते. या साऱ्यातून मुलींवर कलेचे संस्कार घडले. मोठी मृणालनी, धाकटी सायली. या दोघी जीडी आर्ट झाल्या आहेत. त्याही चित्रकलेत रममाण आहेत. घराला घरपण, संसाराला प्रसन्नतेचे रंगभरण कलेतून लाभले. 
- अरुणकुमार पोतदार

Web Title: Arun And Asmita Potdar Success Story special

टॅग्स