गांधी विचारांतून शांतीचे पीक येईल - अरुण गांधी

गांधी विचारांतून शांतीचे पीक येईल - अरुण गांधी

कोल्हापूर - ‘आर्थिक विषमतेमुळे जगामध्ये गरिबी, गुन्हेगारी, दहशतवाद निर्माण झाला. समानता हेच या सर्व प्रश्‍नांचे उत्तर आहे. म्हणूनच मी गांधीजींच्या विचारांची शेती करतो. एका अर्थाने मी शांततेचा शेतकरीच आहे,’ असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांनी केले. त्यांच्या ‘वारसा प्रेमाचा’ या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी ते बोलत होते.

अरुण गांधी यांच्या ‘लिगसी ऑप लव्ह’ पुस्तकाचा लेखिका सोनाली नवांगूळ यांनी मराठीमध्ये अनुवाद केला आहे. ‘वारसा प्रेमाचा’ असे या मराठी अनुवादित पुस्तकाचे नाव आहे. अवनी संस्थेतर्फे या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत अवनीच्या संस्थापिका अनुराधा भोसले यांनी केले. शिक्षण तज्ज्ञ डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. 

अरुण गांधी म्हणाले, ‘‘जगामध्ये आर्थिक विषमता वाढली आहे. त्यामुळे गरिबी, गुन्हेगारी, दहशतवाद हे प्रश्‍न निर्माण झाले. गांधीजींनी मांडलेला समानतेचा विचार हेच यावरचे उत्तर आहे. गांधीजी मला म्हणायचे, तू मोठेपणी शेतकरी हो आणि शांततेची शेती कर. मी आज तेच करतो आहे.’’

गांधी म्हणाले, ‘‘अमेरिकेमध्ये मी अध्यापनाचे काम केले. यावेळी तेथील विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्या सहवासातील प्रसंग मी सांगत असे. यावेळी त्या विद्यार्थ्यांनी मला या अनुभवांचे पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त केले. त्यातून पुस्तक आकाराला आले. पुस्तक विक्रीतून जे पैसे येतील ते सर्व अवनी संस्थेला मदत म्हणून दिले जातील.’’ गांधीजींचे पणतू तुषार गांधी, अरुण चव्हाण, विनोद शिरसाट, सोनाली नवांगूळ उपस्थित होते.

वडिलोपार्जित संपत्ती पिढ्यान्‌पिढ्या प्रवाही होत असते; पण महात्मा गांधींची मूल्ये त्यांच्या चौथ्या पिढीतही आली आहेत. त्यामुळेच सुखासीन जीवन सोडून ते गांधींच्या विचारांचा प्रसार करत आहेत. गांधीजींच्या विचारांचे आचरण हाच त्यांची भक्ती करण्याचा मार्ग आहे.
- डॉ. सुनीलकुमार लवटे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com