विधानसभेला मी पुतण्यासोबत - अरूण नरके

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

गोकुळ व विधानसभा निवडणुकीचा काही संबंध नाही. ज्याप्रमाणे संघाचे नेते महादेवराव महाडिक आपल्या पुतण्यासाठी काहीही करतात त्याचप्रमाणे मीही विधानसभेला पुतण्याच्या मागे असणार आहे. केवळ मी नाही तर माझे सर्व कुटुंबीय पुतण्याच्या मागे असेल

- अरूण नरके

कोल्हापूर - गोकुळ व विधानसभेचे राजकारण हे वेगळे आहे, त्यामुळे गोकुळमध्ये मी जरी नेत्यांसोबत असलो तरी विधानसभेला मी पुतणे आमदार चंद्रदीप नरके यांच्यासोबत असणार आहे, अशी प्रतिक्रिया "गोकुळ' चे ज्येष्ठ संचालक अरूण नरके यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिली. श्री. नरके यांच्या या भूमिकेने "गोकुळ' च्या राजकारणाला नव्याने उकळी फुटली असून यातून श्री. नरके यांनी "गोकुळ' चे नेते पी. एन. पाटील यांनाच इशारा दिल्याचे बोलले जाते. 

ते म्हणाले, ""मी गेली 42 वर्षे गोकुळमध्ये आहे आणि मी स्वतःहून जाहीर केले आहे की मी निवृत्त होणार आहे. माझा मुलगा आता उभा राहील. मला आता 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. योग्यवेळी मी निवृत्त होणार आहे. "गोकुळ' च्या निवडणुकीत माझी 42 वर्षे गेली. गोकुळ व विधानसभा निवडणुकीचा काही संबंध नाही. ज्याप्रमाणे संघाचे नेते महादेवराव महाडिक आपल्या पुतण्यासाठी काहीही करतात त्याचप्रमाणे मीही विधानसभेला पुतण्याच्या मागे असणार आहे. केवळ मी नाही तर माझे सर्व कुटुंबीय पुतण्याच्या मागे असेल.'' 

ते म्हणाले, "" उद्या "गोकुळ' च्या निवडणुकीत नरके विरूध्द नरके लढायला लागले तरी हरकत नाही; पण मैत्री आणि राजकारण वेगळे आहे. "गोकुळ' मध्ये मी कोणासोबतही असलो तरी विधानसभेला माझ्या पुतण्यासोबतच रहाणार आहे. यापूर्वीच्या दोन्हीही निवडणुकीत मी त्याच्यासोबतच होतो, त्याला विजयी करण्यासाठी प्रयत्न केले. आताही मी त्याच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहे.'' 

सध्या जे काही "गोकुळ' मध्ये सुरू आहे, त्यावर मी यापूर्वीच "वेट अँड वॉच' अशी भूमिका जाहीर केली आहे. यावर एखादा प्रबंध लिहावा, असे वाटते असेही जाहीर केले आहे.

चंद्रदीपला तोड नाही 
माझा पुतण्या म्हणून नव्हे तर खरंच चंद्रदीप तगडा उमेदवार आहे. खरोखरच चंद्रदीप चांगले काम करतो, त्याला तोड नाही. असे श्री. नरके म्हणाले. 

दुसऱ्याच दिवशी टोला 
कालच "गोकुळ' मल्टिस्टेट बाबत संघाचे संचालकांची माजी आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत आम्ही नेत्यांसोबत असू अशी ग्वाही संचालकांनी दिली असतानाच त्याच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेबाबत आपली भुमिका स्पष्ट करून श्री. नरके यांनी पी. एन. यांनाच टोला लगावला. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arun Narke comment