कोल्हापूर : मानधन वाढीसाठी आशा वर्कर्सचे बेमुदत चक्री उपोषण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - मानधन वाढीच्या मागणीवरुन जोरदार घोषणाबाजी करत आज आशा वर्कर्स महिलांनी जिल्हा परिषद दणाणून सोडली. या मोर्चात हजारो आशा गटप्रवर्तक महिला सहभागी झाल्या. कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनने जिल्हा परिषदेसमोर मंगळवार (ता.3) बेमुदत चक्री उपोषण सुरू केले.

कोल्हापूर - मानधन वाढीच्या मागणीवरुन जोरदार घोषणाबाजी करत आज आशा वर्कर्स महिलांनी जिल्हा परिषद दणाणून सोडली. या मोर्चात हजारो आशा गटप्रवर्तक महिला सहभागी झाल्या. कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनने जिल्हा परिषदेसमोर मंगळवार (ता.3) बेमुदत चक्री उपोषण सुरू केले.

यावेळी उपस्थित आशांनी शासनाच्या विरोधात नारा देत परिसर दणाणून सोडला. हजारोच्या संख्येने महिला सहभागी असल्यामुळे परिसरातील वाहतूक कोलमडली. 

आशा वर्कर्संना सध्या कामाच्या आधारावर 2500 रुपये मानधन मिळते. तर गटप्रर्वतकांना सरासरी आठ हजार रूपये मानधन मिळते. यात वाढ करावी, या मागणीसाठी हजारो महिला कर्मचारी मंगळवारी रस्त्यावर उतरल्या. सनदशीर मार्गाने वारंवार आंदोलन करूनही मानधनवाढीसह अन्य मागण्या पूर्ण केल्या जात नसल्याने, राज्यातील आशा वर्कर्स युनियनच्या हजारो महिला मंगळवारपासून राज्यव्यापी बेमुदत चक्री उपोषणाचा निर्धार केला आहे. 

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मिळणारे मानधन अत्यल्प आहे. यात वाढ करावी, शासनाकडे सातत्याने विनंती केली, परंतु अद्याप देखील शासनाने आशा वर्कर युनियनची मागणी मान्य केली नाही. 27 ऑगस्ट रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मानधन वाढीच्या कोणत्याही प्रस्तावावर सही न झाल्यामुळे, जिल्ह्यातील हजारो महिलांनी रस्त्यावर उतरत सरकार विरोधातील आक्रोश दाखवून दिला. 

या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चाचे नेतृत्व नेत्रदिपा पाटील, राणी यादव, सुरेखा तिसंगीकर, सारिका पाटील, सुलोचना पाटील, शर्मिला काशीद, प्रतिभा इंदूलकर, मनिषा पाटील आदीनी केले. 

आशा वर्कर्स यांच्या मागण्या रास्त आहे. आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत. मानधन वाढ झाली पाहिजे, यात दूमत नाही, मात्र मानधन वाढीचा निर्णय हा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे संघटनेने केलेल्या मागण्या या शासनापर्यंत पोहोचवल्या जातील. 
- अमन मित्तल,
मुख्य कार्यकारी अधिकारी. 

शासानाने आतापर्यंत आशा वर्कर्सच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. दरवेळी नवीन आश्‍वासन देवून या कर्मचाऱ्यांची फसवणूक सुरु आहे. अनेकवेळा आंदोलने करूनही दखल घेतलेली नाही. केवळ खोटी आश्वासने दिली. किमान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापुर्वी मानधनवाढीचा निर्णय जाहीर करून अध्यादेश काढावा. 
- नेत्रदीपा पाटील,
जिल्हाध्यक्ष,आशा वर्कर्स युनियन.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asha workers agitation in Kolhapur