झोपेतील गवंड्यावर विळ्याने वार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

पत्नी घराबाहेर पडल्यानंतर काही वेळातच अनोळखी व्यक्ती घरात शिरली. झोपेतील गौतम भोसले याच्या गळ्यावर गवत कापण्याच्या विळ्याने वार केले.

राहुरी : घरात झोपलेल्या तरुण गवंड्यावर गवत कापण्याच्या विळ्याने वार करून एकाने पळ काढला. चांदेगाव (ता. राहुरी) येथे बुधवारी (ता. 27) पहाटे पाचच्या सुमारास हा जीवघेणा हल्ला झाला. गौतम मंजाबापू भोसले (वय 32, रा. चांदेगाव), असे जखमीचे नाव आहे. त्यास तातडीने श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. जखम खोल नसून, तरुणाच्या जीवितास कोणताही धोका नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

अशी घडली घटना

इमारतीचे बांधकाम करणाऱ्या राजस्थानी लोकांच्या हाताखाली गौतम भोसले गवंडीकाम करतो. त्याची पत्नी शेतमजुरीचे काम करते. या घटनेबाबत गौतमने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, बुधवारी पहाटेच त्याची पत्नी मजुरीसाठी घराबाहेर पडली होती. भोसले वस्तीवरील वीजपुरवठा खंडित झालेला असल्याने, त्याच्या घरात अंधार होता. गौतम एकटाच घरात झोपलेला होता.

पत्नी घराबाहेर पडल्यानंतर काही वेळातच अनोळखी व्यक्ती घरात शिरली. झोपेतील गौतम भोसले याच्या गळ्यावर गवत कापण्याच्या विळ्याने वार केले. अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पळून गेला. याबाबत बुधवारी उशिरापर्यंत राहुरी पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. जखमी गौतम भोसले याचा जबाब घेऊन गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सांगितले. 

हेही वाचा पानसरे, नाहाटा यांची नागवडे यांच्याशी गुप्त खलबते

पोलिसांना हल्ल्याचाच संशय 

अज्ञात व्यक्ती घरात शिरली; परंतु तिने घरात कशाचीही चोरी केली नाही. त्यामुळे तिचा घरात शिरण्याचा उद्देश समजत नाही. हल्ल्यात वापरलेला विळा पोलिसांना घटनास्थळी सापडला. जखमी गौतम भोसले याची पत्नी शेतमजुरी करते. त्यामुळे गवत कापण्याचे विळे त्यांच्याही घरात आहेत. पती-पत्नीच्या किरकोळ भांडणातून गौतमने घरातील विळ्याने स्वतःच्या गळ्यावर वार केले असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा पारनेर तहसीलदारांवर वाळूचोरांचा हल्ला

जीवितास धोका नाही 

जखमी गौतमची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. तो व्यवस्थित बोलत आहे. त्याच्यावर उपचार केलेल्या डॉक्‍टरांशी चर्चा केली. त्यांनी, डाव्या कानाखाली गळ्यावर जखमा असून, त्या खोल नाहीत. त्यामुळे गौतमच्या जीवितास धोका नसल्याचे सांगितले. सखोल चौकशीअंती घटनेची वस्तुस्थिती समोर येईल. 
मुकुंद देशमुख, पोलिस निरीक्षक, राहुरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assassination attack on young man