वाजपेयींच्या भाषणांनी मंतरलेली सांगली

वाजपेयींच्या भाषणांनी मंतरलेली सांगली

...हे माझे भाग्यच
१९५७ च्या दरम्यान विलिंग्डन महाविद्यालयाच्या पटांगणात वाजपेयींची विद्यार्थी नेता म्हणून जाहीर सभा झाली होती. संघाचे बाबा पोतदार आणि माझा त्या सभेच्या आयोजनात पुढाकार होता. विद्यार्थीदशेतच ते राष्ट्रीय स्तरावरील वक्ते झाले होते. विद्यार्थ्यांच्या तुफान प्रतिसादाने ते भाषण गाजले. त्यानंतर वाजपेयी सांगलीत १९६२ ला आले. जनसंघाच्या नेत्यांनी आम्हाला ५१ हजार रुपयांची पक्षनिधी गोळा करण्याचे आव्हान दिले होते. आम्ही तो गोळा केला. सध्याच्या राजवाड्याच्या पटांगणात  झालेल्या त्या सभेसाठी तुडुंब गर्दी झाली होती. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध वकील केशवराव चौगुले होते. काँग्रेसने तेव्हा या थैली अर्पण सोहळ्याबद्दल अपप्रचार केला होता. वाजपेयींसारख्या छोट्या माणसाचा असा  गौरव करायचे कारण काय अशी ती मोहीम होती. वाजपेयीनी त्या सभेत त्या मोहिमेची खिल्ली उडवताना म्हणाले होते, माझ्या सारख्या छोट्या माणसाचा देशस्तरावरील काँग्रेस विरोधी पक्षात असूनही परदेशी शिष्टमंडळाचे नेतृत्व माझ्याकडे ते का देतात हे समजत नाही. यापुढे असे करताना राष्ट्रीय काँग्रेसने सांगली  जिल्हा काँग्रेसचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा. वाजपेयींचा महाराष्ट्र प्रांताचे संघचालक काकासाहेब लिमये यांच्याशी स्नेह होता. त्यांच्या स्नेहाखातर ते पुढे १९७१ ला गोळवलकर गुरुजींच्या श्रद्धांजली सभेसाठीही आले होते. त्यांच्यासारख्या थोर पुरुषाचे जीवनात मला अनेकवेळा सहवास लाभला हे माझे भाग्यच.
बापूसाहेब पुजारी, ज्येष्ठ नेते

किसीसे मिलने में भय न हो !
माझ्या वैयक्तिक ग्रंथालयातील वाजपेयींच्या ‘तीन तपे संसदेतील...’ या पुस्तकावर स्वाक्षरी घेण्यासाठी मी  त्यांच्या १४ नोव्हेंबर १९९५ च्या सांगली दौऱ्यात भेट घेण्याचा मी प्रयत्न केला. मला सुरक्षेच्या कारणास्तव  रेस्ट हाऊसवर भेट मिळू शकली नाही. त्यामुळे मी माझे स्नेही पत्रकार अशोक घोरपडे आणि तत्कालीन पोलिस निरीक्षक सुभाष डांगे यांच्याकडे पुस्तक आणि एक चिठ्ठी पाठवली. त्या चिठ्ठीत माझा अल्प परिचय आणि ग्रंथालयबद्दल लिहिले होते. डांगे यांनी ती चिठ्ठी वाजपेयींकडे दिली. ती वाचून त्यांनी मला डांगे यांच्या करवी बाहेरून बोलावून घेतले. तुम्ही आत का आला नाहीत अशी विचारणा केली. मी सुरक्षा पास नसल्याने आलो नाही  असे सांगितले. त्यावर ते म्हणाले,‘‘काल मी या पुस्तकाचे प्रकाशन केले आणि आज लगेचच ते तुमच्या संग्रहात कसे याबद्दलही मला कतूहल आहे. तुमचे इतके सुंदर अक्षर पाहून आनंद वाटला. मला माझ्या शिक्षकांची आठवण आली. तुम्ही चिठ्ठीत प्राथमिक शिक्षक  असल्याचे म्हटलेय. शिक्षक घाबरले तर ते धाडसी विद्यार्थी कसे घडवू शकतील. त्यामुळे मी तुम्हाला त्याच अनुषंगाने संदेश दिला तर चालेल का? ’’ त्यानंतर त्यांनी दिलेला संदेश त्यांच्यातील प्रतिभावंताची साक्ष देणारा असाच आहे. ते लिहतात,‘‘हमे ऐसा भारत बनाना है, जिसमें किसी को किसी से मिलने में भय न हो, शुभ कामानाये,’’ त्यानंतर सहा महिन्यांनंतर दिल्लीतील ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांना मूर्तीदेवी पुरस्कार  प्रदान समारंभात त्यांनी माझ्या त्या भेटीची आठवण  त्यांना सांगताच त्यांनी क्षणात डोळे मिटत तो एक प्राथमिक शिक्षक असून त्याचे नाव सदानंद कदम आहे अशी आठवण सांगितली. 
सदानंद कदम, प्राथमिक शिक्षक

वाजपेयी भावी पंतप्रधान
सांगली जिल्हा नगरवाचलनालयाच्या वतीने १९७८ मध्ये गानकोकिळा लता मंगेशकर यांना आजीव सदस्यत्व बहाल करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. भालजी पेंढारकर यांच्या माध्यमातून आम्ही दीदींना हा निर्णय कळवला. दीदींनी होकारही दिला. त्यानुसार वाजपेयींच्या हस्ते आम्ही हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले.  राजारामबापू पाटील मंत्री होते त्यांच्या मदतीने राज्य सरकारने त्यांच्यासाठी स्वतंत्र विमानाची सोय केली  होती. त्या कार्यक्रमाला दीदी येऊ शकल्या नाहीत. त्यांच्यावतीने बंधू हृदयनाथ मंगेशकर आले.  वाजपेयींच्या स्वागतपर भाषणात मी त्यावेळी वाजपेयी भारताचे पुढचे पंतप्रधान आहेत असा परिचय करून दिला होता. त्यावेळी ती अक्षरशः कवी कल्पनाच होती. माझ्या त्या कल्पनेची खिल्ली उडवताना पुढे मुंबईच्या ‘नवाकाळ’मध्ये ‘लाचार प्राध्यापक’ नावाने स्फुट लिहण्यात आले होते. असो. तो कार्यक्रम अतिशय सुरेख आणि नेटका झाला. वाजपेयींनी भाषणात लतादीदींच्या अनेक आठवणी सांगितल्या. रशियाच्या दौऱ्यावर असताना विमानतळावर उतरताच लतादीदींचे स्वर कानावर पडल्याची आठवण सांगताना त्यांनी दीदींचा स्वर कसा जगाला व्यापून टाकणार आहे याबद्दल सुरेख विवेचन केले. त्यानंतर आम्ही त्यांच्या भोजनाची सोय राजवाड्यात जोशींच्या घरी भोजनासाठी नेले. प्रवासाने ते बरेचसे थकले होते. तेथे गेल्या गेल्या ते कॉटवर  पहुडले. आणि स्वतःवरच कोटी करीत म्हणाले,’’ अब सारे कहेंगे वाजपेयी पियेला है..!’’
अशोक घारपुरे, जिल्हा नगरवाचनालयाचे माजी अध्यक्ष

वक्तृत्वाची भुरळ
१९९५ मध्ये कृषिभूषण प्र. शं. ठाकूर यांच्या सत्काराच्या निमित्ताने वाजपेयी सांगलीत आले होते. सकाळी त्यांनी संघाच्या माधवनगर येथील वैद्यकीय केंद्राला भेट दिली. एस. बी. कुलकर्णी यांच्याशी त्यांचा परिचय होता. दुपारी वाजपेयी ठाकूर यांचा सत्कार होता. त्यानंतर तरुण भारत स्टेडियमवर त्यांची जाहीर सभा होती. सभेपूर्वी त्यांनी जिनिव्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केले होते. ते विरोधी पक्षनेते होते. भारतीय लोकशाहीची ताकद 
विशद करताना त्यांनी पाकिस्तानला कधीही काश्‍मीर मिळणार नाही हे ठणकावून सांगितले. या सभेने वाजपेयींच्या वक्‍तृत्वाची
भुरळ पडली. 
प्रकाश बिरजे, ज्येष्ठ नेते

इस्लामपुरात पावसात सभा
वाजपेयी १९८२ आणि १९८७ मध्ये ते दोनवेळा इस्लामपुरात आले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष  असताना सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते.  मी भाजपचा राज्य उपाध्यक्ष होतो. ते १९८२ मध्ये इस्लामपुरात आले. सध्या बसस्थानक असलेल्या भागात प्रचंड पाऊस असतानाही ही सभा झाली आणि श्री. वाजपेयी यांनी जनसमुदायासमोर  भिजतच त्यांनी भाषण केले होते. ते दुसऱ्यांदा १९८७ मध्ये इस्लामपुरात आले होते. तेव्हा ते जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी जुन्या तहसील कचेरीसमोर सभा झाली होती. विद्यमान नगरसेवक बाबासाहेब सूर्यवंशी  शहराध्यक्ष होते आणि अण्णा नवले तालुकाध्यक्ष होते. कै. अशोक पाटील, कै. शंकरराव चौधरी यांची या  सभेला प्रमुख उपस्थिती होती. या सभेत कार्यकर्त्यांनी जमवलेला पक्षनिधी त्यांना दिला. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या घरीही भेट दिली.
अण्णा डांगे, माजी मंत्री 

वाजपेयी १९८२ आणि १९८७ मध्ये ते दोनवेळा इस्लामपुरात आले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष  असताना सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते.  मी भाजपचा राज्य उपाध्यक्ष होतो. ते १९८२ मध्ये इस्लामपुरात आले. सध्या बसस्थानक असलेल्या भागात प्रचंड पाऊस असतानाही ही सभा झाली आणि श्री. वाजपेयी यांनी जनसमुदायासमोर  भिजतच त्यांनी भाषण केले होते. ते दुसऱ्यांदा १९८७ मध्ये इस्लामपुरात आले होते. तेव्हा ते जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी जुन्या तहसील कचेरीसमोर सभा झाली होती. विद्यमान नगरसेवक बाबासाहेब सूर्यवंशी  शहराध्यक्ष होते आणि अण्णा नवले तालुकाध्यक्ष होते. कै. अशोक पाटील, कै. शंकरराव चौधरी यांची या  सभेला प्रमुख उपस्थिती होती. या सभेत कार्यकर्त्यांनी जमवलेला पक्षनिधी त्यांना दिला. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या घरीही भेट दिली.
अण्णा डांगे, माजी मंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com