एटीएम कार्ड सोलापुरात, पैसे काढले बंगळुरूमध्ये! 

ATM
ATM

सोलापूर : सोलापुरातील औषध विक्रेत्याच्या एटीएम कार्डचे क्‍लोनिंग करून बंगळुरूच्या एटीएम सेंटरमधून 30 हजारांची रक्कम काढण्यात आली. हा प्रकार गेल्या महिन्यात घडला. पैसे काढल्याचा मेसेज आल्यानंतर तत्काळ बॅंक आणि पोलिसांकडे तक्रार केल्याने आठ दिवसांत पैसे परत मिळाले. 

दत्त चौकातील औषधे विक्रेते जयराम मोरे (नाव बदलेले आहे) हे गेल्या महिन्यात वैयक्तिक कामानिमित्त बंगळुरूला गेले होते. त्यांनी एटीएम सेंटरमध्ये जाऊन दीड हजार रुपये काढले. चार दिवसांनंतर सोलापुरात आल्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास बॅंक खात्यातून 20 हजारांची रक्कम काढल्याचा मेसेज आला. मोरे यांनी लगेच बॅंकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून तक्रार नोंदविली. तुमच्या एटीएम कार्डचा वापर करून बंगळुरूमधून पैसे काढल्याची माहिती कस्टमर केअरच्या अधिकाऱ्यांनी दिली. मी तर सोलापुरात आहे, बंगळुरूमधून पैसे कसे काढेन? असा सवाल मोरे यांनी केला. खात्री करण्यासाठी तत्काळ एटीएम सेंटरमध्ये जाऊन कार्ड स्वाइप करण्याची सूचना कस्टमर केअरच्या अधिकाऱ्यांनी केली. मोरे यांनी रात्री 12च्या सुमारास एटीएम सेंटरमध्ये जाऊन कार्ड स्वाइप केले. मोरे हे सोलापुरात असल्याची खात्री पटल्यानंतर कस्टमर केअरच्या अधिकाऱ्यांनी कार्ड ब्लॉक करण्याच्या प्रक्रियेला सुरवात केली. दरम्यानच्या काळात मोरे यांच्या खात्यातून आणखी 10 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यांचे कार्ड ब्लॉक करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मोरे यांनी सम्राट पोलिस चौकीत धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब दुधाळ यांनी मोरे यांची तक्रार नोंदवून घेऊन आरबीआयच्या नियमांची माहिती दिली. तक्रारीची प्रत बॅंकेत आणि सायबर पोलिस ठाण्यातही द्यायला सांगितली. आठ दिवसांनंतर मोरे यांच्या खात्यात त्यांचे 30 हजार रुपये परत आले. याप्रकरणात पोलिसांकडून योग्य मार्गदर्शन आणि चांगली वागणूक मिळाल्याचे मोरे यांनी सांगितले. 

एटीएम सेंटरमध्ये सावधान... 
एटीएम सेंटरमध्ये कार्ड स्वाइप करताना क्‍लोनिंग मशिनद्वारे आपला डाटा चोरून डुप्लिकेट कार्ड बनविले जाते. मोठ्या शहरांत असे प्रकार घडत आहेत. पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर एटीएम सेंटरमध्ये क्‍लोनिंग मशिन लावली नाही याची खात्री केल्याशिवाय कार्ड स्वाइप करू नये. 

जयराम मोरे यांनी तत्काळ तक्रार केल्याने त्यांचे पैसे परत मिळाले. तुमची काहीच चूक नसताना खात्यातून पैसे गेले असतील तर आरबीआयकडे तक्रार करता येते. नागरिकांनी एटीएम कार्ड वापरताना दक्षता घ्यावी. कार्ड कोणालाही देऊ नये. पासवर्ड सांगू नये. खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज आला तर तत्काळ तक्रार करावी. 
- बाबासाहेब दुधाळ, पोलिस उपनिरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com