सांगलीत 'ATM'मधील सव्वातीन कोटी लुटले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

कंपनीचे मुख्य कार्यालय दिल्लीतील असून तेथून सर्व व्यवहार चालतात. लियाकत खान आणि आशपाक बैरागदार हे कंपनीचे सांगलीतील प्रतिनिधी आहेत.

बॅंका ऑफ इंडियासह 17 एटीएमचा समावेश : एजन्सीच्या दोघांना अटक

सांगली : ATM मशीनमध्ये पैसे भरणा करणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी 3 कोटी 33 लाख 39 हजार रुपयांना गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार काल रात्री उघडकीस आला. एजन्सीचे कर्मचारी लियाकत सरफराज खान (वय 33) आणि आशपाक अस्लम बैरागदार (21, दोघे रा. मिरज) यांना विश्रामबाग पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली. ATM मशीनमध्ये पैसे भरणा करताना जिल्ह्यातील 17 ठिकाणांहून ही लूट केल्याचे प्राथमिक तापासात निष्पन्न झाले आहे. सायंटिफिक सिक्‍युरीटी मॅनेजमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक मनमोहन जगदिश सिंग (वय 35, रा. न्यू दिल्ली) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बॅंक ऑफ इंडिया प्रमुख बॅंकेसह अन्य बॅंकेच्या ATM मशीनमध्ये पैसे भरणा करण्याचा ठेका सायंटिफिक सिक्‍युरीटी मॅनेजमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे आहे. कंपनीचे मुख्य कार्यालय दिल्लीतील असून तेथून सर्व व्यवहार चालतात. लियाकत खान आणि आशपाक बैरागदार हे कंपनीचे सांगलीतील प्रतिनिधी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते दोघे हे काम पाहतात. एटीएम मशीनमधील पैसे संपल्यानंतर भरणा करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
दरम्यान, पाचशे-हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सर्व एटीएम मशीन बंद ठेवण्यात आले होते. त्यावेळी सोमवारी (ता.14) संपूर्ण रक्कमेची मोजणी करण्यात आली. त्यावेळी तीन कोटी 33 लाख 39 हजार रुपये कमी लागले. दोघांना विचारणा केल्यानंतर त्यांचा हा डाव उघडकीस आला.

लियाकत आणि आशपाक यांनी पैसे भरणा करताना संगनमत करुन वेळोवेळी लूट केली होती. युनाटेड बॅंक उल्हासनगर (कुपवाड), युनायटेड बॅंक ऑफ इंडिया (लक्ष्मीनगर), कर्नाटका बॅंक (विश्रामबाग), बॅंक ऑफ इंडियाच्या सांगलीसह मिरज, बेडग (ता. मिरज), विश्रामबाग, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, विजापूर अशा सतरा एटीएम मशीनमध्ये हा डल्ला मारल्याचे प्राथमिक तपास निष्पन्न झाले.
दरम्यान, कंपनीचे संचालक श्री. सिंग यांनी काल रात्री विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर रात्री उशीरा दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी चौकशी केली असतान दोघांनीही लूट केल्याची कबुली दिली. त्यानुसार अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जादा रक्कमेची शक्‍यता
सोमवारी (ता.14) एटीएम मशीन बंद असल्याने त्यातील पैशांची मोजणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. प्रथमिक तपासात 3 कोटींची रक्कम ढापल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतू याहून अधिक रक्कम असल्याची शक्‍यता आहे. दोघां संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

अशी केली लूट
बॅंक ऑफ इंडियासह अन्य बॅंकेच्या एटीएम मशीनमध्ये दरररोज पैसे भरणा करण्यासाठी हे दोघे जात होते. त्यावेळी त्यातील रक्कम परस्पर काढून घेतली जात होती. हा प्रकार वर्षभर सुरु असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. वर्षभरातील काढलेली ही रक्कम आहे.

Web Title: atm cash of 3.25 crore looted in sangli