आटपाडी : ऐन दिवाळीच्या तोंडावर आटपाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी पगारवाढीच्या मागणीसाठी संपावर गेलेत. दुसरीकडे उत्पन्नातील 25 टक्के पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करता येत नाही, असा तिढा निर्माण झाला आहे.
संपात आकृतिबंधनुसार पगार मिळणारे आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही सहभागी झालेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. या प्रक्रियेमुळे राजकीय गंध असलेला संप चिघळत चालला आहे.
आटपाडी ग्रामपंचायतीकडे सध्या 48 कर्मचारी कार्यरत आहेत. यातील शासनाच्या धोरणाप्रमाणे आकृतिबंधातील सहाच कर्मचारी आहेत. त्यांना शासन नियमाप्रमाणे पगार भत्ता मिळतो. इतर कर्मचारी अनेक वर्षांपासून त्यावेळची गरज पडल्यामुळे नेमणूक केलेत. त्यांना सेवेत कायम केले आहे मात्र ते आकृतिबंधात बसत नाहीत. त्यांना कमी पगार मिळतो, अशी त्यांची तक्रार होती. त्याआधारे दरवर्षी पगारात पाचशे रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार दोन महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या पगारात पाचशे रुपये वाढ केली, मात्र यावर त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी दिवाळीचा मोका साधून पगारवाढीसाठी संपाचे हत्यार काढले. गेले तीन दिवस 40 कर्मचारी संपावर गेलेत. यात आकृतिबंधातील एक आणि अत्यावश्यक सेवेतील पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
संपावर जाण्याअगोदर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक झाली, मात्र तोडगा निघाला नाही. सध्या ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातील 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होतो. शासन नियमाप्रमाणे कर्मचारी पगारावर पंचवीस टक्के, मागासवर्गीयासाठी पंधरा, अपंग पाच, शिक्षणासाठी 25 टक्के या पद्धतीने निधी खर्च करण्याचे निर्देश आहेत. यामुळे ग्रामपंचायतीला पगार वाढवता येत नाही, तर कमी पगारात काम करणे कर्मचाऱ्यांना परवडत नाही, अशी सध्याची स्थिती निर्माण झाली आहे. यावर गरज नसलेले कर्मचारी कमी करून इतरांचा पगार वाढवणे हाच पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
राजकीय गंध लागलेला संप चिघळत चालला आहे. शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यावर मेस्मा अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ग्रामपंचायतीने पोलिसांकडे केली आहे. कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे राजकीय वास लागलेल्या संपाला वेगळेच वळण लागले आहे.
आकृतिबंधातीलही एक संपात
आकृतिबंधातील एक कर्मचारीही या संपामध्ये सहभागी झाला आहे. त्यांना शासन नियमाप्रमाणे पगार आणि इतर भत्ते मिळतात. मात्र, ते संपात का सहभागी झालेत, याचे गुपित उघड झाल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार
सांगली
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.