वसुलीसाठी सावकाराचा नवविवाहितेवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

एक नजर

  • अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियंता असलेल्या नवविवाहितेवर एका खासगी सावकाराचा अत्याचार. 
  • पतीला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी संबंधित महिलेला सिगारेटचे चटके, अमानुष मारहाण.
  • एका महिलेसह चार संशयितांवर गुन्हा दाखल.

 

कोल्हापूर - अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियंता असलेल्या नवविवाहितेवर एका खासगी सावकाराने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पतीला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी संबंधित महिलेला सिगारेटचे चटके देऊन त्याने अमानुष मारहाणही केली.

पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने अखेरीस एका महिला सामाजिक कार्यकर्तीने घडलेला प्रकार पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यापर्यंत पोचविला. त्यांच्या आदेशानुसार तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. याबाबत एका महिलेसह चार संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम जुना राजवाडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत 
सुरू होते. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी - अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतलेली शहरातील एक तरुणी आणि पुण्यातील एक तरुण यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांनी सहा महिन्यांपूर्वी घरच्यांचा विरोध डावलून प्रेमविवाह केला. शहरातील उच्चभ्रू वस्तीत ते दोघे सध्या भाडेकरू म्हणून राहतात.

घरच्यांचे पाठबळ नसल्याने पतीने व्यवसायासाठी मित्राकडून ३० हजार रुपये घेतले. महिनाभर त्याने ते पैसे तसेच दिले. त्यानंतर तो मित्र त्याच्याकडे दिलेल्या पैशापोटी दिवसाला साडेतीन हजार रुपये व्याजाची मागणी करू लागला. त्याप्रमाणे पीडित महिलेच्या पतीने त्याला साडेदहा हजार रुपये दिले.

उर्वरित पैसे तो देऊ शकला नाही. पैशांच्या वसुलीसाठी खासगी सावकार त्याच्या घरात येऊ लागला. तेथेच मद्यप्राशन करीत व सिगारेट ओढत बसायचा. हा प्रकार पाहून पीडित महिलेने पतीकडे तक्रार केली. त्यामुळे पैसे लवकर देऊन त्याचा विषय मिटविण्याचा पतीकडून प्रयत्न सुरू होता. 

दरम्यान, पतीला काही दिवसांपूर्वी त्या खासगी सावकाराने दोन मित्रांच्या मदतीने कामासाठी बाहेर बोलवून घेतले. त्याची पत्नी घरात एकटी होती. हीच संधी साधून खासगी सावकार तिच्या घरात गेला. तिला महत्त्वाचे काम असल्याचे सांगून मोटारीतून घेऊन गेला. त्याने तिला सायंकाळी कळंबा रोडवरील एका मोकळ्या मैदानात नेले. तेथे मोटारीतच त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा त्याने तिला गाठले. त्याने ‘तुझी अश्‍लील चित्रफीत तयार केली आहे, ती व्हायरल करतो’ अशी तिला धमकी दिली. तसेच दिलेले कर्ज माफ करतो, असे सांगून तिच्यावर अनेकदा अत्याचार केले.

त्यानंतर तो दोन साथीदारांशीही शरीर संबंध ठेवण्याबाबत तिला सांगत होता. एका महिलेच्या माध्यमातून तिला धमकी दिली जात होती. त्या सर्वांकडून तिला सिगारेटचे चटके व अमानुष मारहाण केली जात होती. अखेरीस तिने हा प्रकार पतीला सांगितला. त्या दोघांनी याबाबतचा तक्रार अर्ज जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिला; मात्र तो अर्ज वरिष्ठांपर्यंत पोचलाच नाही. त्यामुळे पुढील कार्यवाही झाली नाही. 

अखेरीस हा प्रकार पीडित व तिच्या पतीने सामाजिक कार्यकर्त्या गीता हासूरकर यांना सांगितला. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून हा प्रकार पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या कानावर घातला. त्यांनी तातडीने याबाबतची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी स्वतः या तपासात लक्ष घातले. पीडित महिलेची फिर्याद नोंदवून खासगी सावकार व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्याचे काम आपल्या कार्यालयात सुरू केले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. त्या चौघांवर बलात्कार, खासगी सावकारी, धमकावणे, अमानुष अत्याचार अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल केले जातील, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

पीडित महिलेवर अत्याचार करणाऱ्या चार संशयितांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्यांचा शोधही सुरू असून, लवकरच त्या सर्वांना जेरबंद केले जाईल. त्‍यांना कठोर शिक्षा होईल, असा तपास करू.
- प्रेरणा कट्टे,
शहर पोलिस उपअधीक्षक

Web Title: Atrocities on newly married girl crime against Lender